करोनाच्या नावाखाली बंद केलेल्या सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांचे हाल
बई : पूर्वी भारतीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट सवलत होती. पण रेल्वे मंडळाने गेली पाच वर्षे ही सवलत योजना बंद केली. करोनाच्या नावाखाली बंद केलेल्या तिकीट सवलतीमुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
करोनाच्या आधी ६० वर्ष आणि त्यावरील वयाच्या पुरुष ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांवर ४० टक्के सवलत मिळत होती. तर, ५८ वर्षे त्यावरील वयाच्या महिला ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटांवर ५० टक्के इतकी सवलत मिळत होती. म्हणजे प्रवासाच्या तिकीटाची निम्मी रक्कम द्यावी लागत होती. परंतु, २० मार्च २०२० पासून ही सवलत रेल्वेने बंद केली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सध्या तिकीटांवर थेट सवलत लागू नाही. ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य प्रवाशांप्रमाणे पूर्ण तिकीट भाडे आकारण्यात येत आहे.
सध्या सवलतीचे तिकीट देण्याबाबत कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. परंतु, त्याचा पुनर्विचार करण्यात येणार आहे. विशेषत: शयनयान आणि तृतीय वातानुकूलित डब्यासाठी सवलत देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. सध्या रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना लोअर बर्थ प्राधान्याने लागू केला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अपर बर्थवर जाणे टाळता येईल.
Indian Navy : आत्मनिर्भर भारताच्या दिशेने नौदलाची वाटचाल; माजी नौदल प्रमुखांनी मांडला नौदल प्रगतीचा आढावा
करोनाच्या आधी भारतीय रेल्वे जवळपास सर्व मेल, एक्स्प्रेस, राजधानीसारख्या रेल्वेगाड्यांमध्ये सवलतीत तिकीट देत होती. सामाजिक आणि मानधर्माची सुविधा होती. जेणेकरून वृद्ध प्रवाशांना सोयीचा आणि स्वस्त प्रवास करणे शक्य होत होते. परंतु, करोनाकाळात ज्येष्ठ नागरिकांनी अनावश्यक प्रवास कमी करण्याच्या उद्देशाने सवलतीचे तिकीट रद्द केले. मात्र करोना, टाळेबंदी संपल्यानंतरही ही सवलत सुरू करण्यात आलेली नाही.
भारतीय रेल्वेने जुलै २०२५ मध्ये भाडेवाढ केली. त्यानंतर आता २६ डिसेंबरपासून नवी भाडेवाढ करण्यात येईल. विनावातानुकूलित ५०० किमी प्रवासासाठी प्रवाशांना अधिकचे १० रुपये मोजावे लागतील. सामान्य श्रेणीच्या २१५ किमीच्या प्रवासासाठी कोणतीही भाडेवाढ नाही. सामान्य श्रेणीच्या २१५ किमीपेक्षा जास्त प्रवासासाठी १ पैसा प्रतिकिमी भाडेवाढ केली. मेल/एक्स्प्रेस विनावातानुकूलित डोब्यासाठी २ पैसे प्रतिकिमी भाडेवाढ केली. वातानुकूलित श्रेणीसाठी २ पैसे प्रतिकिमी भाडेवाढ केली. जर ज्येष्ठ नागरिकांची सवलत पुन्हा लागू न झाल्यास, या भाडेवाढीचा भूर्दंड ज्येष्ठ नागरिकांना सहन करावा लागेल.
Western Railway Block: पश्चिम रेल्वेच्या ब्लॉक कालावधीत बेस्टच्या जादा बस
महाराष्ट्रात सध्या सुमारे १.५ कोटी ज्येष्ठ नागरिक असून, ते राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या ११.७ टक्के आहेत. ही संख्या वेगाने वाढत आहे. मुंबईतच ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची संख्या सुमारे १५ लाख इतकी असून, २०३१ पर्यंत ती जवळपास २४ लाखांपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. तसेच देशातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे २० टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष केले जाते. गेली पाच वर्षे ज्येष्ठ नागरिकांना तिकीटातील सवलत बंद आहे. याबाबत अनेकदा प्रशासनाकडे दाद मागितली. परंतु, सवलत योजना सुरू झालेला नाही. – विजय औंधे, सल्लागार, ज्येष्ठ नागरिक महासंघ






