GRAMIN SEARCH BANNER

सनसेट पॉइंटवरून पडलेली तरुणी अद्याप बेपत्ता; शोधमोहीमेत तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरची मदत मागवली

रत्नागिरी : रत्नदुर्ग किल्ल्याजवळील सनसेट पॉइंटवरून २९ जून रोजी उडी घेणारी नाशिक येथील सुखप्रीत धालिवाल ही तरुणी अद्याप बेपत्ता आहे. या प्रकरणी मागील दहा दिवसांपासून पोलिस, एनडीआरएफ आणि माऊंटेनिअर्सच्या टीमकडून सतत शोधमोहीम राबवली जात असून, अत्यंत कठीण भूगोल आणि खोल दर्‍या यांमुळे शोध कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखप्रीत २९ जून रोजी आपल्या मित्राला भेटण्यासाठी रत्नागिरीत आली होती. दुपारी सुमारे १२.३० वाजता तिने रत्नदुर्ग किल्ल्यावरील रेलिंगजवळ आपली चप्पल आणि स्कार्फ ठेवले आणि नंतर कठड्यावरून उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. यानंतर तिचे वडील रत्नागिरीत दाखल झाले आणि शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीत सुखप्रीतच्या वडिलांनी तिच्या मित्रावर फसवणूक केल्याचा आरोप केला असून, त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सुखप्रीतचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने या प्रकरणाच्या तपासात अडथळे निर्माण झाले आहेत.

सुखप्रीतने आत्महत्या करण्याआधी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती, ज्यामध्ये तिने आपल्या मनातील वेदना व्यक्त केल्या होत्या. या प्रकरणाच्या गांभीर्यामुळे पोलिसांनी तटरक्षक दलाकडे हेलिकॉप्टरद्वारे शोध घेण्यासाठी मदत मागितली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिला असून, मदतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.

Total Visitor

0225033
Share This Article