उच्च न्यायालयाचे भारतीय पुरातत्त्व विभागाला आदेश
रत्नागिरी : युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथील कातळशिल्प आणि रेखाचित्रांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे आदेश उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्त्व विभागासह शासनाला दिले आहेत. त्यामुळे प्रागैतिहासिक काळातील संस्कृती अधोरेखित करणारी तालुक्यातील बारसू परिसरातील कातळशिल्पांचे जतन अन् संवर्धन दृष्टिक्षेपात आले आहे.
रत्नागिरी-राजापूर परिसरात मोठ्या प्रमाणात कातळशिल्पांचा शोध लागला आहे. प्रागैतिहासिक काळातील संस्कृती या कातळशिल्पांतून अधोरेखित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू, देवाचेगोठणे, कशेळी, रूंढे तळी, विनायक कदम, ग्रामस्थ, धोपेश्वर बारसू, देवीहसोळ, जांभरूण, उक्षी येथे आढळलेली कातळशिल्पे साधारणपणे २० हजार वर्षे जुनी आहेत. त्यामुळे अश्मयुगीन आणि ऐतिहासिक कलेचा उत्तम नमुना म्हणून याकडे पाहता येते; मात्र या परिसरात औद्योगिक अथवा विकासात्मक काम करण्यास मज्जाव करावा, अशी मागणी करणारी याचिका गणपत राऊत, रामचंद्र शेळके आणि महेंद्रकुमार गुरव यांनी केल्या होती. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि केंद्र सरकारने प्राचीन स्मारके आणि पुरातत्त्व स्थळे आणि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या रेखाचित्रांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करावी. तसेच रत्नागिरीमध्ये आणखी रेखाचित्रे, कातळशिल्पे, प्राचीन जीवनाची इतर चिन्हे असू शकतात. त्यामुळे त्या परिसराला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. याचिका नुकतीच निकाली काढण्यात आली. पुरातत्त्वने या कातळशिल्पांसह नव्याने सापडलेल्या शिल्पांचेही जतन, संरक्षण आणि देखभाल करावी, प्राप्त झालेला निधीचा वापर या कातळशिल्पांच्या देखभालीसाठी करावा, याचिकाकर्त्यांच्या शिफारसी, सूचनाही ऐकून घ्याव्यात, असे आदेशही मुख्य न्यायाधीश आलोक आराध्ये आणि न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठाने शासनाला दिले आहेत.
अश्मयुगीन वैशिष्ट्यपूर्ण कातळशिल्प
राजापूर तालुक्यातील गोवळ, साखरकोंबे, बारसू, सोलगाव, देवाचेगोठणे, उपळे, भालावली, सोगमवाडी, देवीहसोळ, विखारेगोठणे, रूंढे येथे २००हून अधिक कातळशिल्पं आहेत. निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबूड, धनंजय मराठे, डॉ. सुरेंद्र ठाकूर-देसाई यांनी कधी संशोधन करून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोधलेल्या कातळशिल्पांमध्ये विविध प्राणी, भौमितिक रचना, मनुष्याकृती, चित्रकृती व दिशादर्शक खुणा आदींचा समावेश आहे. बारसू, गोवळ, देवाचेगोठणे परिसरातील सड्यावर सुमारे ६० चौ. कि. मी क्षेत्रफळाच्या सड्यावरील वैविध्यपूर्ण कातळखोद चित्रे अश्मयुगीन मानवनिर्मित असल्याचे संशोधक, तज्ज्ञांकडून सांगितले जाते.
कोकणातील कातळशिल्पांच्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचला
