तहसीलदारांवर वाढतोय ताण, कामांच्या निपटाऱ्यासाठी रात्री उशिरापर्यंत थांबण्याची वेळ
राजापूर : येथील तहसील कार्यालयात कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे नागरिकांची कामे करताना कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. नागरिकांना अत्यावश्यक प्रमाणपत्रे, दाखले, फेरफार, महसूल संदर्भातील कामे करण्यासाठी तहसील कार्यालयाचा दरवाजा ठोठवावा लागतो, पण तिथे कुणी ऐकणारे नाही. रोजच्या रोज शेकडो नागरिकांची कामे प्रलंबित राहत असून, प्रशासन मात्र कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी कुठलीही ठोस पावले उचलताना दिसत नाही. ही नुसती उदासीनता नाही, तर जनतेच्या सहनशीलतेची चेष्टा आहे. लोकांची कामे खोळंबत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
या कार्यालयात १८ लिपिक पदे मंजूर असताना केवळ ४ जण कार्यरत आहेत. अव्वल कारकून १० पैकी फक्त ६, तर ८ शिपायांच्या जागांवर केवळ १ शिपाई काम करत आहे. याचा थेट परिणाम म्हणजे कामकाजाचा गोंधळ, अपूर्ण नोंदी, विलंब आणि नागरिकांचा वाढता संताप. जेवढे कर्मचारी आहेत, त्यांच्यावर एवढा ताण आहे की त्यांना मानसिक आणि शारीरिक थकवा जाणवू लागला आहे. तरीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ‘काम लवकर करा’ अशा केवळ सूचना मिळत आहेत, मदत मात्र कुठेच नाही.
तहसीलदार विकास गंबरे हे स्वतः खूप प्रामाणिकपणे काम करत आहेत. अनेकदा ते रात्री ८ वाजेपर्यंत कार्यालयात थांबून प्रलंबित अर्जांची पूर्तता करत असतात. पण एकट्याने किती झगडायचं? पाठीशी कर्मचारी नसताना, कामाचा डोंगर वाढत असताना, लोकप्रतिनिधींचा दबाव असताना, हा लढा एकट्याचा ठरतो आहे.
वरचा प्रशासन काहीही करत नाही, ना जिल्हा पातळीवर बैठक, ना रिक्त पदांची तत्काळ भरती – सगळे केवळ कागदावर. या अक्षम्य दुर्लक्षामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दररोज कार्यालयात चकरा मारून सुद्धा कामे होत नाहीत. नागरिक त्रस्त झाले आहेत, पण कुणी ऐकायला तयार नाही. जे अधिकारी आणि कर्मचारी आज कार्यरत आहेत, त्यांना यंत्रासारखे काम करावे लागत आहे – कोणताही मानवी विचार न ठेवता.
लोकप्रतिनिधींना केवळ दबाव टाकण्याची सवय लागली आहे, पण त्या मागे आवश्यक सुविधा आणि मनुष्यबळ देण्याबाबत त्यांची पूर्ण उदासीनता आहे. प्रशासकीय यंत्रणा केवळ आदेश देऊन चालत नाही, तिला बळकटी आणि आधार लागतो. आणि तो सध्या या कार्यालयाला मिळालेला नाही.
राजापूरसारख्या तालुक्याच्या मुख्य कार्यालयाची जर ही अवस्था असेल, तर जिल्ह्याच्या आडवळणातील गावांची परिस्थिती किती दयनीय असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. प्रशासनाने आता तरी जागे होऊन तात्काळ पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांचा रोष उफाळून बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही.
राजापूर तहसील कार्यालयात कर्मचाऱ्यांचा तुटवडा; लोकांची कामे खोळंबली; प्रशासन अजूनही झोपेत!
