लांजा : तालुक्यातील शिपोशी फाटा येथे दुपारी उघड्या रस्त्यावर गवारेडा बिनधास्तपणे फिरताना दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दाभोळे-कोर्ले-तटूळ मार्गावर रस्त्याच्या मधोमध चालणाऱ्या गव्याला पाहून अनेकांनी थक्क होऊन आपल्या मोबाईलमध्ये हा क्षण कैद केला.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्नाच्या शोधात वन्यप्राणी माणसांच्या वस्तीच्या दिशेने येत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बिबट्या, साळंदर, डुकर, ढेकर, ससा, गवार्डे यांसारखे प्राणी पूर्वीही निदर्शनास आले असले, तरी रस्त्याने मोकळेपणे फिरणारा गवारेडा हा प्रकार धक्कादायक होता.
सह्याद्रीच्या घनदाट जंगलांमधून हे प्राणी आता लोकवस्तीच्या सीमारेषा ओलांडू लागले आहेत. शिपोशी, खरवसे, वाडगाव, हसोळ, तळवडे, कुर्ने, बापेरे, सोळवशी, साटवली, रूण, पुनस, वेरळ, कणकवली आणि कुरचुंब या गावांमध्ये गवारेडे वारंवार दिसून येत आहेत.
शिपोशी फाट्यावर अचानक गव्याचे दर्शन होताच काही क्षणांसाठी भीतीने नागरीक स्तब्ध झाले. मात्र, आरडाओरड होताच गवारेड्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. वनविभागाने या प्रकाराची गंभीर दखल घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
लांजातील रस्त्यावर भलामोठा गवारेडा! वाहन चालकांची पाचावर धारण
