रत्नागिरी : जिल्ह्यात डेंग्यूसारख्या विषाणूजन्य आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांना यश मिळाले आहे. यावर्षी जून अखेरपर्यंत केवळ ७ डेंग्यू रुग्ण आढळले असून, ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. मागील वर्षी याच कालावधीत तब्बल २५६ रुग्ण आढळले होते.
पावसाळ्याच्या आगमनासोबतच हवामानात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे डेंग्यूचा धोका वाढतो. डासांमुळे पसरणाऱ्या या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाने जानेवारीपासूनच नियोजनबद्ध मोहीम राबवली. डासांची पैदास होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या.
जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी सांगितले की, डेंग्यू हा संक्रमित डासाच्या चाव्यामुळे होणारा आजार असून त्याचे मुख्य लक्षण म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींची संख्या कमी होणे. याशिवाय ताप, डोकेदुखी, सांधेदुखी, त्वचेवर पुरळ, मळमळ व थकवा यांसारखी लक्षणे दिसून येतात.
ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा भागांमध्ये औषध फवारणी तसेच जनजागृती मोहिमा राबवण्यात आल्या. विशेष म्हणजे ‘ऑईल बॉल’ या नवीन तंत्राचा वापरही करण्यात आला. यामध्ये तेलयुक्त बॉल पाण्यात टाकल्याने डासांची अंडी नष्ट होतात आणि डासांच्या संख्येवर नियंत्रण मिळते.
सध्या पावसाळी वातावरणामुळे ठिकठिकाणी पाणी साचते आहे, त्यामुळे डासांच्या वाढीची शक्यता अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सायंकाळी आणि पहाटे डासांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे यावेळी विशेष सतर्कता बाळगावी, असेही डॉ. यादव यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यात जूनअखेर आढळले 7 डेंग्यूचे रुग्ण; रुग्णसंख्येत मोठी घट
