तुषार पाचलकर / राजापूर : गेल्या काही महिन्यांपासून राजापूरसह संपूर्ण जिल्ह्यात मोकाट गुरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या गंभीर समस्येकडे जागृत नागरिक, पत्रकार आणि ग्रामस्थांनी वारंवार लक्ष वेधूनही ठोस तोडगा अद्याप निघालेला नाही.
अलीकडेच तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ. जस्मिन यांनी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून गावस्तरावर समित्या स्थापन करण्याचे, पशुसंवर्धन विभागातर्फे गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करण्याचे तसेच गुरांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनी ही समस्या फक्त प्रशासनाची नसून सर्वांनी मिळून उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही आवाहन केले होते.
तरीदेखील, 23 सप्टेंबर रोजी नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्त्यावर, अगदी राजापूर पोलीस ठाण्याच्या समोरच मोकाट गुरांचा वावर आढळून आला. यामुळे प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनांकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले का, अशी चर्चा नागरिकांत रंगली आहे.
राजापूर शहरातील मुख्य मार्गांवर वारंवार गुरे रस्त्यात बसल्याने वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचेही प्रमाण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
नगरपरिषद यापुढे मोकाट गुरांच्या समस्येवर कोणती ठोस भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजापूरात मोकाट गुरांचा उपद्रव कायम ; प्रशासनाकडून ठोस उपाययोजना कधी?
