GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी साळवी स्टॉप जलतरण तलावाच्या बाजूला आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

Gramin Varta
322 Views

रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप येथील शासकीय जलतरण तलावाच्या परिसरात एका ट्रकच्या बाजूला सुमारे ४० वर्षे वयाचा एक अनोळखी इसम बेशुद्धावस्थेत आढळून आला. त्याला तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास साळवी स्टॉप परिसरात उभ्या असलेल्या ट्रकच्या (क्रमांक एम.एच.०८-ए.पी.-३३७२) कडेला एक इसम उताण्या स्थितीत पडलेला असल्याची माहिती सावळाराम बापू सावंत यांना मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहिले असता, संबंधित इसम हालचाल करत नसल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर, पोलिसांनी आणि सावळाराम सावंत यांनी एका खाजगी रुग्णवाहिकेच्या मदतीने त्या इसमाला जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, दुपारी १२:२० वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ. जान्हवी यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.

मृत इसमाच्या अंगात पांढऱ्या चौकटीचा शर्ट आणि फुल पँट असून त्याचे वय अंदाजे ४० वर्षे आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये गुन्हा क्रमांक ०५/२०२६ नुसार नोंद केली आहे. या व्यक्तीचे नाव आणि गाव अद्याप समजू शकलेले नाही. जर कोणाला या व्यक्तीबद्दल काही माहिती मिळाल्यास त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3375727
Share This Article