GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर: तरुण पिढीकडून पारंपरिक नमन कलेचे जतन; कसबा देवपाट मंडळाचा बाजारपेठेत उत्साह

Gramin Varta
131 Views

संगमेश्वर (वार्ताहर):कोकणच्या मातीतील चैतन्याचा उत्सव असलेल्या शिमगोत्सवाचा आनंद सध्या सर्वत्र ओसंडून वाहत असून, याच उत्सवाचे औचित्य साधून कसबा देवपाट येथील नमन मंडळाने संगमेश्वर बाजारपेठेत आपल्या पारंपरिक कलेचे बहारदार सादरीकरण केले. पूर्वजांनी सुरू केलेली आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही नमन परंपरा सध्याच्या आधुनिक युगातही तरुण पिढीतील कलाकारांनी तितक्याच निष्ठेने आणि श्रद्धेने जपल्याचे या निमित्ताने प्रकर्षाने दिसून आले.शिमगोत्सवाच्या निमित्ताने या नमन मंडळाने संगमेश्वर बाजारपेठेतील प्रत्येक दुकानाला भेट देऊन ग्रामदेवतेचा आशीर्वाद पोहोचवला.

ढोल-ताशांच्या खणखणीत आवाजात आणि पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांच्या लिलया सादरीकरणामुळे संपूर्ण बाजारपेठ परिसरात एक आगळेवेगळे चैतन्य निर्माण झाले होते. यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनीही या नमन मंडळाचे अत्यंत उत्साहात स्वागत करून कलाकारांचे कौतुक केले. बदलत्या काळाच्या ओघात अनेक लोककला लुप्त होत असताना, कसबा देवपाट येथील तरुणांनी मात्र आपल्या संस्कृतीचा वारसा अत्यंत अभिमानाने पुढे नेला आहे. पूर्वजांनी घालून दिलेल्या मूळ पद्धतीला कुठेही धक्का न लावता, शिस्तबद्ध पद्धतीने सादर केलेल्या या नमनाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. जुन्या पिढीतील जाणकारांनीही या तरुण रक्ताच्या कौशल्याचे आणि परंपरेप्रती असलेल्या त्यांच्या आदराचे विशेष कौतुक केले. कोकणातील ही नमन कला केवळ मनोरंजनाचे साधन नसून ती या मातीची सांस्कृतिक ओळख आहे, आणि ही ओळख टिकवून ठेवण्यासाठी तरुण पिढीचा असाच सक्रिय सहभाग असणे काळाची गरज असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Total Visitor Counter

3358612
Share This Article