GRAMIN SEARCH BANNER

मंडणगडमध्ये ट्रॅव्हलर बसच्या धडकेत लांज्यातील दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू

मंडणगड : आंबडवे–लोणंद राष्ट्रीय महामार्गावर मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ बौद्धवाडी येथे रविवारी (दि. १ मार्च २०२६) सकाळी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ट्रॅव्हलर बसने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत हा अपघात घडला असून घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.मृत युवकाचे नाव साहिल विजय बेंद्रे (वय २३) असे असून तो मूळचा लांजा तालुक्यातील खोचरे येथील रहिवासी होता. सध्या तो घाटकोपर (मुंबई) येथे वास्तव्यास होता. शिमगोत्सव साजरा करण्यासाठी साहिल आपल्या आठ मित्रांसमवेत दुचाकीवरून दापोली तालुक्यातील पांगारी गावाकडे जात होता. मात्र प्रवासाच्या अखेरच्या टप्प्यातच काळाने त्याच्यावर झडप घातली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, म्हाप्रळ बौद्धवाडी येथे महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्त्यावर डायव्हर्शन देत एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास साहिल दुचाकीने पुढे जात असताना समोरून मुंबईच्या दिशेने जाणारी प्रवासी ट्रॅव्हलर बस अतिवेगाने व बेदरकारपणे येत दुचाकीला समोरून धडकली. या धडकेत साहिल बसच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला सहप्रवासी दूर फेकला जाऊन जखमी झाला.जखमी सहप्रवाशाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भिंगळोली येथे दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मंडणगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली असून अपघातास कारणीभूत वाहन व चालक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. संबंधित चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

Total Visitor Counter

3485589
Share This Article