GRAMIN SEARCH BANNER

राज्यात बंदी असूनही गुटख्याचा काळाबाजार; वर्षभरात ३ हजारांहून अधिक जेरबंद, २३९ कोटी १० लाखांचा बेकायदा गुटखा जप्त

मुंबई : राज्यात गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. २०२५ या वर्षात २,४३८ गुन्हे दाखल झाले असून त्यातील २,४१४ गुन्हे उघड झाले आहेत.या कारवाईत पोलिसांनी ३,१७३ आरोपींना अटक करून २३९ कोटी १० लाख रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरामधून दिली आहे.विधानसभेत सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या ३९ आमदारांनी राज्यात होत असलेल्या अवैध गुटखा व सुगंधित तंबाखूबाबत तारांकित प्रश्न विचारला आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेल्या उत्तरात ठाणे, भिवंडी, नाशिक, अहिल्यानगरसह राज्यात बेकायदेशीरपणे गुटखा विक्री होत असल्याने त्याविरोधात पोलिसांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत पोलिसांनी १३,७८३ गुन्हे दाखल करत १८,५०१ आरोपींना अटक केली आहे. तर, २०२५ मध्ये नाशिकच्या दिंडोरी येथील मे. ईलिटकॉन इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीवर टाकलेल्या छाप्यात सुगंधित तंबाखू व उत्पादनासाठीचे साहित्य आढळून आल्याने केलेल्या कारवाईत ९,०६,२५,४२५ किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.ठाणे शहर पोलिस आयुक्तालय अंतर्गत कल्याण नाका येथील कारवाईत पोलिसांनी ५४ लाख ९९ हजारांचा गुटखा जप्त केला आहे. तर, समृद्धी महामार्गावर कोपरगावकडे जाणाऱ्या टोलनाक्याजवळ ७६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याशिवाय राज्यात अन्य ठिकाणी टाकलेल्या छाप्यात ३,१७३ आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

Total Visitor Counter

3487549
Share This Article