✍️ भरत माने / साखरपा
नवी मुंबई – नेरुळ सेक्टर 15 येथील इच्छापूर्ती श्री दत्त दिगंबर स्वामी मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव अत्यंत भक्तिमय आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या निमित्ताने मंदिरात दिवसभर हजारो भक्तांनी हजेरी लावून सद्गुरू दिगंबर स्वामी यांचे दर्शन घेतले.
यंदाचा उत्सव दिनांक 3 जुलै ते 9 जुलै या कालावधीत सामुदायिक गुरुचरित्र पारायण यासह विविध धार्मिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. सद्गुरूंच्या सुमारे 200 पेक्षा अधिक अनुयायांनी सामूहिक पारायणात सहभाग घेतला. मंदिरात दररोज अखंड गुरुचरित्र पारायण आणि हरिपाठाची परंपरा जपली जाते.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे 4 वाजता सद्गुरूंच्या अभ्यंगस्नानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अभिषेक, आरती, आणि पादुकाभिषेक पार पडले. गायत्री महायज्ञ घालून भक्तांच्या आरोग्य, समाधान व शांतीसाठी प्रार्थना करण्यात आली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरलेला भव्य दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर सर्व भक्तांसाठी महाप्रसाद वितरित करण्यात आला. दुपारी नामदान समारंभ, नामयज्ञ, हरिपाठ, सत्संग आणि महाआरती झाली.
सद्गुरू दिगंबर स्वामी यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबीर व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या उपक्रमांना भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिगंबर स्वामी यांनी समाजासाठी नशामुक्ती, संसारसुधारणा व आध्यात्मिक जागृती यासाठी केलेल्या कार्याचे भक्तांनी स्मरण केले.
उत्सव यशस्वी होण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी, सभासद, भक्तगण तसेच अनेक अन्नदाते आणि देणगीदार यांनी सहकार्य केले. दिगंबर स्वामी यांनी सर्वांचे आभार मानत, वर्षभर होणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या गुरुपौर्णिमा उत्सवात संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातीलही अनेक भक्तांनी सहभाग घेतला. गुरु-शिष्य परंपरेचा हा सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडला.
इच्छापूर्ती दत्त दिगंबर मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा; हजारो भक्तांनी घेतले दर्शन, आरोग्य व रक्तदान शिबीराचे आयोजन
