तुषार पाचलकर/राजापूर : राजापूर आणि लांजा तालुक्यांतील तुलनेत सर्वाधिक बार व रेस्टॉरंट असलेल्या पाचल (ता. राजापूर) ग्रामपंचायत हद्दीतील व्यावसायिकांनी आज, दिनांक १४ जुलै २०२५ रोजी, आहार संघटनेच्या राज्यव्यापी बंदला पाठिंबा देत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत आपले व्यवसाय बंद ठेवले.
ही बंद कारवाई वाढीव कर व दरवाढीच्या निषेधार्थ करण्यात आली. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, शासनाच्या नव्या धोरणांमुळे बार व परमीट रूम व्यवसायावर मोठा आर्थिक बोजा येणार असून, त्यामुळे संपूर्ण व्यवसायच ठप्प होण्याची भीती आहे. याचा प्रत्यक्ष फटका मद्यप्रेमींना बसणार असून परिणामी, स्वस्त आणि अनधिकृत दारूकडे ग्राहक वळण्याची शक्यता आहे. यामुळे काळा बाजार आणि इतर अवैध व्यवसायांना प्रोत्साहन मिळण्याची भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
“आम्ही नियमित महसूल भरूनही आमची गळचेपी होत आहे. आर्थिक स्थैर्य कोलमडत आहे. या व्यवसायावर अनेक कामगार, पुरवठादार आणि इतर घटक अवलंबून आहेत. त्यामुळे हा फटका केवळ आमच्यापुरता मर्यादित राहणार नाही,” असे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले.
शासनाने या धोरणात तातडीने सुधारणा करून थोडासा दिलासा द्यावा, अशी एकमुखी मागणी बार व रेस्टॉरंट व्यावसायिकांकडून करण्यात आली आहे.
पाचलमध्ये बार आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांचा बंद आंदोलनात सहभाग
