GRAMIN SEARCH BANNER

सावर्डे विद्यालयाची राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत झळाळती कामगिरी; हुमेरा सय्यदला सुवर्ण आणि रौप्य पदक

Gramin Varta
289 Views

सावर्डे:कोकणातील चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टच्या क्रीडासंकुलात संपन्न झालेल्या ‘डेरवण यूथ गेम्स २०२६’ या राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवात सावर्डे येथील गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. सह्याद्री शिक्षण संस्था संचलित या विद्यालयाची उदयोन्मुख खेळाडू हुमेरा सय्यद हिने मैदानी स्पर्धांमध्ये आपल्या वेगवान कौशल्याचा ठसा उमटवत दुहेरी मुसंडी मारली आहे. सोळा वर्षांखालील वयोगटात झालेल्या अटीतटीच्या लढतीत हुमेराने ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदकाची कमाई केली.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या शेकडो अनुभवी आणि सरावलेल्या खेळाडूंच्या उपस्थितीत हुमेराने मिळवलेले हे यश सावर्डे परिसरासाठी अभिमानास्पद ठरले आहे.हुमेराच्या या नेत्रदीपक यशामागे विद्यालयातील क्रीडा शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि तिची जिद्द कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. या यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार शेखरजी निकम, विश्वस्त मारुतीराव घाग, चंद्रकांत सुर्वे, शांताराम खानविलकर, आकांक्षा पवार, मानसिंग महाडिक, सचिव महेश महाडिक यांच्यासह विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे व उपप्राचार्य विजय चव्हाण यांनी हुमेराचे व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही ग्रामीण भागातील खेळाडू राज्यस्तरावर आपली चमक दाखवू शकतात, हे हुमेराने सिद्ध केल्यामुळे तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitor Counter

3366873
Share This Article