GRAMIN SEARCH BANNER

राजापूरच्या गंगास्थानावरील काशीकुंडात सापडलेल्या प्राचीन शिलालेखाबाबत सर्वत्र कुतूहल

Gramin Varta
434 Views

राजापूर:कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजापूरच्या गंगास्थानावरील काशीकुंडात एक प्राचीन शिलालेख सापडल्याने इतिहास संशोधक आणि भाविकांमध्ये मोठ्या कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे. दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या गंगामाईच्या वास्तव्यामुळे हे क्षेत्र नेहमीच चर्चेत असते, मात्र आता ऐतिहासिक शिलालेखाच्या शोधामुळे या स्थानाचे प्राचीन संदर्भ नव्याने समोर येत आहेत. इतिहास संशोधक आणि शिलालेख वाचक अनिल दुधाने यांनी या शिलालेखाचा सखोल अभ्यास केला असून, अक्षरांच्या वळणावरून हा शिलालेख १६ व्या किंवा १७ व्या शतकातील असावा, असा कयास त्यांनी व्यक्त केला आहे.गंगास्थानावरील काशीकुंड हे भाविकांच्या स्नानासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याच कुंडाच्या एका बाजूला असलेल्या दगडावर “चरण रज भास्कर काशी जोशी सोमेश्वरकर” अशी वळणदार अक्षरे कोरलेली आढळली आहेत. या शिलालेखावर काळाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी, त्यावरील मजकुराचा अर्थ ‘काशी-निवासी जोशी वंशातील भास्कर, जे सोमेश्वरकर म्हणून ओळखले जातात’ असा होतो. ऐतिहासिक दस्ताऐवजांनुसार, छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी दोनदा गंगास्नान केल्याचे उल्लेख आढळतात, तसेच १६६४ मध्ये त्यांच्या विनंतीवरून गागाभट्टांनी येथे विद्वानांची सभा घेतल्याचे दाखलेही इतिहासात मिळतात. त्या पार्श्वभूमीवर या शिलालेखाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राजापूरच्या गंगेचा उल्लेख मेदिनी पुराणातही आढळतो, तर सातवाहन राजाने या कुंडांचा जीर्णोद्धार केल्याचे मानले जाते. शालिवाहन राजा सोमेश्वर याने देखील इ.स. १२५५ ते १२६५ या काळात येथे वस्ती केल्याचे संदर्भ इतिहासात सापडतात. अशा प्राचीन वारसा लाभलेल्या ठिकाणी सापडलेला हा शिलालेख तत्कालीन सामाजिक आणि धार्मिक स्थितीवर प्रकाश टाकणारा ठरत आहे. या शिलालेखाच्या यशस्वी वाचनासाठी आणि संशोधनासाठी अनिल दुधाने यांना राजापूरचे पत्रकार व इतिहास अभ्यासक विनोद पवार यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात जिथे पाण्याची टंचाई जाणवते, तिथे गंगामाईचे अवतरण होणे आणि आता अशा ऐतिहासिक खुणा सापडणे, यामुळे राजापूरच्या वैभवात मोलाची भर पडली आहे.

Total Visitor Counter

3305022
Share This Article