GRAMIN SEARCH BANNER

संगमेश्वर : शृंगारपूरमध्ये घरात शिरला बिबट्या, नागरिक भयभीत

Gramin Varta
596 Views

सचिन यादव / संगमेश्वर : तालुक्यातील शृंगारपूर येथे शुक्रवारी रात्री बिबट्याने गावात शिरून भीतीचे वातावरण निर्माण केले. सदाभाऊ यांच्या घराच्या शेजारी असलेल्या पारड्यात बिबट्याने एका कोंबडीवर झडप घालून तिला उचलून नेत असताना सदाभाऊ यांच्या पत्नी सौ. जयश्री म्हस्के यांनी आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्या काही काळ दबा धरून लपून बसला. मात्र काही वेळानंतर तो पुन्हा बाहेर येत बिनधास्तपणे वावरू लागला.

बिबट्याचा वावर सुरू असल्याची माहिती मिळताच गावकरी एकत्र जमले. नागरिकांनी आरडाओरड करताच बिबट्या महादेव सुर्वे यांच्या घरात शिरला. ही घटना श्री. वामन म्हस्के व विमलाकांत पवार यांनी ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर सरपंच श्री. विनोद पवार यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली.

वनविभागानेही तत्काळ घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावून मोहीम सुरू केली. राजा म्हस्के यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी या कामात सहकार्य केले. अखेर पावणे नऊच्या सुमारास बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पकडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Total Visitor Counter

3387352
Share This Article