आईशी रागावून घराबाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी; 12 तासांत नातेवाईकांच्या ताब्यात

saurabhsalvi26@gmail.com
1 Min Read

देवरुख पोलिसांची धडाकेबाज कारवाई

संगमेश्वर : तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता झाल्याची फिर्याद 18 नोव्हेंबर रोजी नातेवाईकांनी देवरुख पोलिस ठाण्यात नोंदवली. फिर्याद मिळताच पोलिसांनी वेळ न दवडता शोधमोहीम हाती घेतली. पोलिस हेड कॉन्स्टेबल मसुरकर, पोलिस कॉन्स्टेबल सचिन कामेरकर आणि पोलिस कॉन्स्टेबल लगारे, पोकाॅ प्रशांत साळुंखे यांनी पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी शोध सुरू केला.

आईने रागावल्यामुळे दुखावलेली, दहावीची ही मुलगी घरातून कशाचाही अंदाज न देता बाहेर पडली होती. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मुलीचा मोबाईल बंद असणे, ती कोणत्या दिशेने गेली याचा ठोस माग न लागणे यामुळे परिस्थिती गंभीर होत चालली होती.

पोलिसांनी मित्रमैत्रिणी, नातेवाईक, परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीकडे लक्ष देत तिचा मागोवा घेतला. अखेरीस ती आपल्या एका जवळच्या मैत्रिणीकडे असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन मुलीची समजूत काढली आणि तिला सुरक्षितपणे नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

या संपूर्ण प्रकरणात देवरुख पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि वेगवान तपासामुळे नातेवाईकांनी दिलासा घेतला आहे. परिसरातही पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *