GRAMIN SEARCH BANNER

देवरुख शहरात सुरक्षेचे कवच; १३ महत्त्वाच्या ठिकाणी बसणार सीसीटीव्ही

Gramin Varta
81 Views

देवरुख:शहरातील वाढती लोकसंख्या, विस्तारणारे व्यापारी क्षेत्र आणि वाहतूक कोंडीमुळे उद्भवणारे अपघात तसेच चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी देवरुख नगरपंचायतीने आता कंबर कसली आहे. शहराच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा १३ ठिकाणी ‘तिसरा डोळा’ म्हणजेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती नगराध्यक्ष मृणाल शेट्ये यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.

प्रसिद्ध पर्यटनस्थळ मार्लेश्वर जवळच असल्याने देवरुख शहरात पर्यटकांची मोठी वर्दळ असते, तसेच विविध शासकीय कार्यालयांमुळे हे शहर तालुक्याचे मुख्य केंद्र बनले आहे. मात्र, अरुंद रस्त्यांमुळे होणारे अपघात आणि अलीकडच्या काळात वाढलेल्या चोरीच्या घटनांमुळे स्थानिक व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने सुमारे ३३ लाख रुपयांची तरतूद करून ही सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे निश्चित केले आहे. यापूर्वी पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार अनेक व्यापाऱ्यांनी स्वखर्चाने कॅमेरे बसवले असून त्याचा तपासकार्यात फायदा होत आहेच, परंतु आता नगरपंचायतीच्या या निर्णयामुळे शहराच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार आहे. सावरकर चौक, शिवाजी चौक, माणिक चौक, मातृमंदिर चौक, मार्लेश्वर तिठा, मच्छी मार्केट, वरची आळी नाका आणि खाके कॉर्नर यांसारख्या वर्दळीच्या ठिकाणांसह एकूण १३ जागांवर हे कॅमेरे नजर ठेवणार आहेत. या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष वैभव पवार आणि मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांचीही उपस्थिती होती.

Total Visitor Counter

3357471
Share This Article