GRAMIN SEARCH BANNER

अर्जुना प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा; आमदार किरण सामंत यांचे प्रशासनाला निर्देश

राजापूर : राजापूर तालुक्यातील करक-पांगरी येथील अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसन आणि नागरी सुविधांबाबतच्या विविध समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच, विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी राज्याचे पुनर्वसन मंत्री यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच अर्जुना प्रकल्पातील नागरी सुविधा, पुनर्वसन आणि उर्वरित भूमिसंपादनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आमदार सामंत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या आणि अडचणी समोर मांडल्या. त्यांनी प्रशासनाला आदेश दिले की, प्रकल्पग्रस्तांच्या छोट्या-मोठ्या समस्या, दाखल्यांसंदर्भातील अडथळे यासाठी तातडीने विशेष शिबीर आयोजित करावे.

अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाचा सिंचन प्रकल्प असून, अर्जुना नदीवर करक-पांगरी येथे 2012 मध्ये मातीचे धरण बांधण्यात आले. प्रकल्पासाठी एकूण 661.273 हेक्टर जमीन आवश्यक होती, त्यापैकी 658.477 हेक्टर क्षेत्र संपादित झाले असून उर्वरित क्षेत्राचे खाजगी वाटाघाटीद्वारे संपादन सुरू आहे.

या प्रकल्पामुळे करक आणि पांगरी ही गावे बाधित झाली असून त्यांचे पुनर्वसन करक 1, करक 2, पाचल आणि पांगरी येरडव या चार नव्या गावठाणांमध्ये करण्यात आले आहे. पुनर्वसनानंतर या गावांमध्ये उपलब्ध करून द्यावयाच्या १८ नागरी सुविधांपैकी काही सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, याची दखल आमदार सामंत यांनी घेतली. त्यांनी शिल्लक सुविधा तात्काळ पुरविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह, अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी बोरकर, प्रांताधिकारी जीवन देसाई, जलसंधारणचे अधीक्षक अभियंता सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, गटविकास अधिकारी श्री. जाधव, माजी जि.प. सदस्य विलास चाळके, करकचे सरपंच सुरेश ऐनारकर, पांगरी खुर्द सरपंच अमर जाधव, माजी सरपंच सुनील जाधव, पाणी वापर संस्था तळवडेचे अध्यक्ष संदीप बारसकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Total Visitor Counter

2455626
Share This Article