GRAMIN SEARCH BANNER

दापोली कृषी विद्यापीठासह राज्यातील चार केंद्रांवर होणार ‘अ‍ॅग्री एआय सेंटर’

Gramin Varta
33 Views

कोकणातील शेती होणार हायटेक

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाने राज्यातील कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी ‘महाॲग्री-एआय’ धोरण २०२५-२०२९ जाहीर केले असून, याअंतर्गत राज्यातील चार प्रमुख कृषी विद्यापीठांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता व इनक्युबेशन केंद्रे स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा समावेश असल्याने कोकणातील शेती आता हायटेक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स आणि भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून उत्पादन वाढवणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरावर ‘एआयएआयसी’ या मुख्य केंद्राची स्थापना करण्यात आली असून, दापोलीसह राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे प्रादेशिक केंद्रे कार्यरत होणार आहेत.

या केंद्रांच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना प्रोत्साहन दिले जाईल आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने आधुनिक संशोधनावर भर दिला जाणार आहे. या धोरणांतर्गत शेतीतील प्रत्यक्ष समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढवला जाणार असून, विशेषतः हवामान अंदाज, पीक संरक्षण आणि जलव्यवस्थापन यांसारख्या बाबींवर एआय तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाईल. या धोरणाच्या माध्यमातून राज्यातील शेती क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचा शासनाचा मानस असून, कृषी विद्यापीठांमधील या केंद्रांना प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. दरम्यान, याच धोरणांतर्गत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय देखील चर्चेत असून, नेमकी कर्जमाफी कोणत्या निकषावर दिली जाणार आणि त्यासाठी शेतकऱ्यांची कोणती तांत्रिक माहिती संकलित केली जाणार, याबाबतची प्रक्रियाही शासनाकडून स्पष्ट केली जात आहे.

Total Visitor Counter

3184146
Share This Article