GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत घटस्फोटाचे वाढते प्रमाण; पाच महिन्यांत ३४ प्रस्ताव दाखल, ९ संसारांना तारले!

रत्नागिरी: सध्याच्या काळात संसार तुटण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे. अगदी किरकोळ कारणांवरून होणारे वाद थेट घटस्फोटापर्यंत पोहोचत असून, प्रेमविवाह झालेल्या दाम्पत्यांमध्येही वर्ष-दोन वर्षांत घटस्फोट घेण्याची तयारी केली जात आहे. यामुळे विवाह संस्थेचे भविष्य धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयात जानेवारी ते मे २०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीत घटस्फोटासाठी तब्बल ३४ प्रस्ताव दाखल झाले आहेत. या वाढत्या प्रकरणांमध्ये दिलासा देणारी बाब म्हणजे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून ९ दाम्पत्यांमध्ये यशस्वी तडजोड घडवून त्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत.

रत्नागिरी जिल्हा न्यायालयात दाखल झालेल्या या ३४ प्रकरणांमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत संबंधित जोडप्यांमध्ये समुपदेशन आणि तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातात. प्राधिकरणाने केलेल्या अथक समुपदेशनामुळेच गेल्या पाच महिन्यांत ९ जोडप्यांमधील वाद मिटून त्यांचे संसार पुन्हा सुरु झाले आहेत, हे विशेष.

घटस्फोटामागील प्रमुख कारणे:

घटस्फोटाच्या वाढत्या प्रकरणांमागे अनेक कारणे आहेत. संशयी वृत्ती हे त्यापैकी एक प्रमुख कारण ठरत आहे. पती-पत्नींमध्ये एकमेकांबद्दल संशय वाढू लागला आहे, ज्यात मोबाईल फोन हे अनेकदा मुख्य कारण ठरत असल्याचे दिसून येते. याशिवाय, विवाहबाह्य संबंधांमुळेही घटस्फोटांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. पती-पत्नीमधील वाढलेला अहंकार हेही अनेकदा घटस्फोटाचे कारण बनतो. व्यसनाधीनता हे देखील घटस्फोटाचे एक महत्त्वाचे कारण आहे. पती व्यसनाधीन असल्यास, त्यातून पत्नीला किंवा मुलांना मारहाण करणे, तसेच पत्नीचा सासरी होणारा छळ यांसारख्या कारणांमुळेही घटस्फोट घेतला जातो.

समुपदेशनाची महत्त्वाची भूमिका:

घटस्फोटासाठी प्रस्ताव दाखल झाल्यानंतर या संपूर्ण प्रक्रियेत न्यायालयाकडून होणारे समुपदेशन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. यामुळे अनेक तुटत असलेले संसार वाचतात आणि त्यातून मुलांचे आयुष्यही सावरण्यास मदत होते. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे समुपदेशनाचे हे कार्य कौतुकास्पद असून, यामुळे अनेक कुटुंबे एकत्र टिकून आहेत.

Total Visitor Counter

2455299
Share This Article