मुंबई: मुंबईतल्या वडाळा ते भक्ती पार्क या मार्गावर प्रवासी मोनो रेलमध्ये अडकून पडल्याची घटना समोर आली. सुमारे दोन तास मोनो रेलमध्ये प्रवासी अडकून पडले होते. त्या ठिकाणी अग्निशमन दल, क्रेन हे सगळं बोलवण्यात आलं आणि मोनो रेलची काच फोडून प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली.
भक्ती पार्कच्या मैसूर कॉलनी या ठिकाणी ही घटना घडली. दरम्यान या मोनो रेलमधल्या सर्व ५८२ प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?
संध्याकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास आम्हाला मोनोरेल एका जागेवरच थांबल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये लोक अडकून पडल्याचं कळलं. ज्यानंतर आम्ही तातडीने या ठिकाणी आलो आणि बचावकार्य सुरु केलं. आम्ही मोनोरेलच्या डब्यांमध्ये अडकलेल्या ५८२ प्रवाशांची सुटका केली आहे. सगळ्यांना सुखरुप खाली उतरवलं आहे. या घटनेतील सर्व प्रवासी सुरक्षित आहे. कुठलीही जीवितहानी झालेली नाही. काही जणांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्या सगळ्यांना आम्ही रुग्णालयात उपचारांसाठी नेलं होतं. अनेक लोक घाबरुन गेले होते. त्यामुळे त्यांना श्वास कोंडल्यासारखं वाटत होतं. पण साडेतीन तासात आम्ही सगळ्या प्रवाशांना सुखरुप खाली उतरवलं आहे. असं अग्निशमन दाचे अधिकारी रविंद्र अंबुलगेकर यांनी सांगितलं.
मोनो रेलमध्ये अडकून पडलेल्या सर्व ५८२ प्रवाशांची अग्निशमन दलाने केली सुटका, साडेतीन तास चाललं बचावकार्य
