गणपतीपुळे, आरे, गणेशगुळे, दापोली, पाजपंढरी, भाट्ये आदी किनाऱ्यांचा समावेश
रत्नागिरी : कोकण किनारपट्टीला वारंवार बसणाऱ्या चक्रीवादळांच्या तडाख्यातून तसेच समुद्राच्या वाढत्या उधाणापासून किनाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पाअंतर्गत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या विशेष प्रकल्पांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण २५ संवेदनशील ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे उभारण्याच्या कामांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी देण्यात आली असून, यासाठी सुमारे ७८ कोटी ७८ लाख रुपयांहून अधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
सीआरझेड व पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेल्या ठिकाणी प्रत्यक्ष कामांना वेग आला असून, काही ठिकाणी कामे सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती पत्तन अभियंता वीणा पुजारी यांनी दिली. पत्तन अभियंता विभागाच्या माहितीनुसार रत्नागिरी तालुक्यातील आरे व नेवरे येथे प्राधान्याने कामांना सुरुवात होत आहे. आरे येथे ८२५ मीटर लांबीच्या बंधाऱ्यासाठी ८ कोटी १९ लाख ८० हजार ७६४ रुपये, तर नेवरे येथे ५२५ मीटर लांबीच्या बंधाऱ्यासाठी ५ कोटी २३ लाख ८७ हजार ६७३ रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. आरे येथे कामाची क्षेत्रनिश्चिती व आखणी पूर्ण झाली असून, येत्या दोन दिवसांत यंत्रसामग्री तैनात केली जाणार आहे.
रत्नागिरी तालुक्यात गणेशगुळे येथे ७ कोटी ९२ लाख ३२ हजार रुपये खर्चाचा १,१७२ मीटर लांबीचा बंधारा, भाट्ये येथे ६ कोटी ३३ लाख ८१ हजार रुपये खर्चाचा ८८४ मीटरचा बंधारा तसेच गावखडी येथे ७ कोटी ९ लाख ३५ हजार रुपयांची संरक्षक कामे हाती घेण्यात आली आहेत. वेळणेश्वर (वेंगणी) येथे ५ कोटी ५३ लाख ५९ हजार, घेरापूर्णगड येथे २ कोटी ९३ लाख ७७ हजार रुपयांच्या निधीतून संरक्षक भिंती व बंधारे उभारले जात आहेत. तसेच गणपतीपुळे येथील संवेदनशील किनाऱ्यासाठी ३० लाख ३६ हजार रुपयांचे जिओ बॅग्स बंधाऱ्याचे कामही या योजनेत समाविष्ट आहे.
दापोली तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांमध्येही या प्रकल्पाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्यात आला आहे. दापोली उपविभागांतर्गत आडे येथे ३ कोटी ५३ लाख १२ हजार, कर्दे (भाग १) येथे ३ कोटी ५३ लाख ५ हजार, तर कर्दे (भाग २) येथे ४ कोटी ९२ लाख २३ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. कोळथरे येथे ३ कोटी ५२ लाख ६९ हजार, लाडघर येथे ४ कोटी २२ लाख ३९ हजार तसेच मुरुड येथे ५ कोटी ६३ लाख ७ हजार व ५ कोटी ६४ लाख २४ हजार रुपयांची दोन स्वतंत्र कामे मंजूर झाली आहेत. हर्णे (भाग १ व २) येथे मिळून सुमारे ८ कोटी ३० लाख रुपयांहून अधिक निधीतून बंधारे उभारले जात आहेत.
याशिवाय दापोलीतील पाजपंढरी येथे ३ कोटी ५१ लाख ३९ हजार, बुरोंडी येथे ३ कोटी ५३ लाख ५ हजार, पाडले येथे ३ कोटी ९७ लाख ९७ हजार, साळुंद्रे येथे ४ कोटी ५८ लाख ४९ हजार तसेच करंजगाव येथे ३ कोटी ८९ लाख ४६ हजार रुपयांच्या कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.
या सर्व २५ प्रकल्पांच्या अंमलबजावणीदरम्यान पर्यावरण नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, पारंपरिक दगडी बंधाऱ्यांसोबतच आधुनिक जिओ बॅग्स व संरक्षक भिंतींचा वापर करण्यात येत आहे. भविष्यातील नैसर्गिक आपत्तींमधून किनारपट्टीवरील वस्त्या, बागा व स्थानिक जनजीवन सुरक्षित राहावे, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असल्याचे पत्तन अभियंता वीणा पुजारी यांनी स्पष्ट केले.






