GRAMIN SEARCH BANNER

शेतकऱ्यांना आश्वासने, उद्योजकांना कर्जमाफी ; चिपळुणातील प्रचार सभेत अबू आझमींचा आरोप

Gramin Varta
157 Views

चिपळूण : राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असून, हे राज्याचे मोठे दुर्दैव आहे. “शेतकरी नसेल तर अन्नदान्यही नाही. गरीब शेतकऱ्यांची थकबाकी राहिली तर तात्काळ कारवाई होते, पण उद्योजकांसाठी मात्र कोटींच्या कर्जमाफ्या सहज दिल्या जातात,” अशी टीका समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी सरकारवर केली.

नगराध्यक्षपदासाठी मोईन पेचकर आणि नगरसेवकपदासाठी मुशर्रफ पेचकर या उमेदवारांच्या समर्थनार्थ गोवळकोट रोडवरील मुमताज बॅन्क्वेट येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

आझमी पुढे म्हणाले की, सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफीची केवळ आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात ठोस उपाययोजना होत नाहीत. राज्यातील रस्ते, पाणीपुरवठा आणि शिक्षण यांसारखे मूलभूत प्रश्‍न बिकट अवस्थेत आहेत. शहराच्या विकासासाठी समाजवादी पक्षाचे दोन्ही उमेदवार निवडून देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

“पैसे घेऊन मतदान करणे हा आपल्या समाजाच्या संस्कारात बसत नाही. स्वाभिमानाने मत द्या,” असे आवाहनही त्यांनी मंचावरून केले.

सभेत नगराध्यक्षपदाचे उमेदवार मोईन पेचकर यांनी चिपळूणच्या विकासाच्या प्रश्‍नांवर आधारित निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमात सदाकत पेचकर यांनी अबू आझमी यांचा सत्कार केला.

Total Visitor Counter

3206617
Share This Article