खेड : तालुक्यातील मुरडे गोठलवाडी येथे बुधवारी सायंकाळी गावठी बॉम्बचा स्फोट होऊन १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगल परिसरात शिकारीसाठी स्फोटक ठेवण्यात आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या स्फोटात प्रणव सुरेश येसरे (वय १२) हा मुलगा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला तातडीने कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्याला सांगली येथे हलविण्यात आले आहे.
सायंकाळच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाल्याने गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून श्वान पथकाच्या मदतीने तपास करण्यात येत आहे.
पोलिसांकडून गावातील नागरिकांची चौकशी सुरू असून संबंधित स्फोटक नेमके कोणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवले होते, याचा तपास सुरू आहे. शिकारीसाठी गावठी बॉम्बचा वापर करण्यात आला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
या घटनेनंतर मुरडे गोठलवाडी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.
खेड : गावठी बॉम्बचा स्फोट; १२ वर्षीय मुलगा गंभीर जखमी






