GRAMIN SEARCH BANNER

निवेंडी–चाफे रस्ता अरुंद; वाहतुकीला अडथळा, अपघातांचा धोका वाढला

Gramin Varta
158 Views

वैभव पवार / गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील निवेंडी–चाफे–मालगुंड हा महत्त्वाचा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढला आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी निवेंडी येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार व सामाजिक कार्यकर्ते उल्हास पिंपुटकर यांनी केली आहे.

याबाबत माहिती देताना पिंपुटकर म्हणाले की, जयगड–रत्नागिरी मार्गाला जोडणारा मालगुंड–निवेंडी–रत्नागिरी हा रस्ता निसर्गरम्य निवेंडी गावातून जातो. सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा हा रस्ता आजही अधिकृत गाव नकाशावर नोंदलेला नसून, गेल्या पाच वर्षांत त्याचे केवळ दोनदा डांबरीकरण करण्यात आले आहे. हा मार्ग मालगुंड, गणपतीपुळे, वरवडे व जयगडपर्यंत जोडला जातो. तसेच नेवरे, धामणसे, गणपतीपुळे, मालगुंड कळझोंडी व खंडाळा आदी पोटरस्तेही या मार्गाशी संलग्न आहेत.

सध्या या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली असून दर मिनिटाला वाहनांची ये-जा सुरू असते. मात्र रस्ता अरुंद असल्याने मोठी वाहने एकमेकांच्या बाजूने नेताना अडचणी निर्माण होतात. परिणामी किरकोळ अपघातांची संख्या वाढत आहे.

निवेंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर आंबा व काजू बागायती आहेत. शेतकरी मजुरांची ने-आण, शेतीसाठी लागणारे साहित्य व फवारणीसाठी वाहनांचा वापर करतात. मात्र रस्त्याच्या अरुंदतेमुळे त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. चाफे–गणपतीपुळे रस्ता निवेंडी गावाच्या एका बाजूने सांबरेवाडी मार्गे जात असल्याने पर्यटकांची गणपतीपुळ्याकडे जाण्यासाठी निवेंडी मार्गालाच पहिली पसंती असते. निसर्गसौंदर्याने नटलेला हा मार्ग सुरक्षित असून लोकवस्तीतून जात असल्याने तो अधिक सोयीस्कर ठरतो.

निवेंडी रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास पर्यटकांची वर्दळ निश्चितच वाढेल, शेती व्यवसायाला चालना मिळेल आणि पर्यटकांना थेट शेतकऱ्यांच्या शेतावरून आंबा-काजू खरेदी करता येईल. त्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास होईल आणि मुंबईसारख्या शहरांकडे जाणारी तरुण पिढी गावातच थांबेल. या सर्व बाबींचा विचार करून निवेंडी–चाफे रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करणे अत्यावश्यक आहे, असे उल्हास पिंपुटकर यांनी स्पष्ट केले.

Total Visitor Counter

3200134
Share This Article