GRAMIN SEARCH BANNER

पुणे पोलीस दलात कोसुंब, संगमेश्वरचे सुपुत्र ए.पी.आय. राकेश जाधव यांनी चमकदार कामगिरीने  मिळवला नावलौकिक

Gramin Varta
50 Views

संगमेश्वर : तालुक्यातील कोसुंब गावचे सुपुत्र श्री. राकेश शशिकांत जाधव सध्या कोंढवा पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक(ए.पी.आय.) म्हणून कार्यरत आहेत. पोलीस दलातील चमकदार कामगिरीच्या आधारावर त्यांची उत्तम सेवा सुरू आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल नुकतेच मा. देवेंद्र  फडणवीस, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि मा. अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी राकेश जाधव यांचा समावेश असलेल्या पथकाला  सन्मानचिन्ह देऊन गौरविले आहे. या अगोदर विविधांगी उत्कृष्ट कामगिरीसाठी राकेश यांचा अमितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी विशेष सन्मान केला आहे.

ए.पी.आय. राकेश जाधव यांनी अलीकडेच पुणे येथे घडलेल्या बहुचर्चित अत्याचार प्रकरणाचा जलदगतीने व कौशल्यपूर्ण तपासाद्वारे २४ तासात सत्य घटनेचा उलगडा करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल मा. पोलीस आयुक्तांनी सन्मानित केले. पाकीटमारी, घरातील व इतर ठिकाणच्या चोऱ्या तसेच दरोडे, घरगुती हिंसाचार, वाहन चोरी, आर्थिक फसवणूक, शस्त्रास्त्र तस्करी, पूर्व वैमनस्यातून खुनाचा प्रयत्न, अशांतता व दहशत विरोधी कारवाई, कोयता गँग प्रकरण, स्त्रियांवरील छेडछाड व अत्याचार अशा प्रकारच्या विविध गुन्ह्यांची उकल करून गुन्हेगारांना शिक्षा व पिडीताना त्यांनी योग्य न्याय मिळवून दिला आहे. कोंढवा परिसरातील सामाजिक शांतता व सलोख्यासाठी नियमितपणे राकेश आणि सहकार्याकडून विविध प्रयत्न केले जातात.

ए.पी.आय. राकेश जाधव कोसुंबचे प्रतिष्ठित नागरिक सौ. भारती व शशिकांत बापूजी जाधव यांचे कनिष्ठ सुपुत्र. शशिकांत जाधव यांच्या एस.टी.तील नोकरीमुळे  राकेश यांचे बालपण कोसुंब येथे गेले. राकेश यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा, कोसुंब येथे, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी माध्यमिक विद्यालय, कोसुंब येथे झाले. त्यानंतर आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातून बी.ए. पदवी संपादन केली. सन २००३ मध्ये राकेश यांनी रत्नागिरी पोलीस दलातील सेवेस प्रारंभ केला.

सन २०१२ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा १४३व्या क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. यानंतरच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीमधील प्रशिक्षणात ७७५ प्रशिक्षणार्थींमधून ३२वे स्थान प्राप्त केले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पहिली नियुक्ती मुंबई येथे होऊन २०१४ ते २०२२ कालावधी  तेथे सेवा केली. यानंतर पुणे पोलीसमध्ये सन २०२२ ते आजपर्यंत कार्यरत आहेत. आपल्या दैनंदिन सेवेतून वेळात वेळ काढून गावातील विविध कार्यांमध्ये त्यांचा सहभाग असतो. आपल्या पोलीस सेवेतील यशस्वी वाटचालीमध्ये अर्धांगिनी सौ. पूर्वा जाधव यांचा भक्कम पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची शालेय वयातच स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी, यासाठी त्यांनी व त्यांच्या वर्गमित्रांनी महत्वपूर्ण १०० स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तकांचा संच, तसेच शिक्षणाबरोबर खेळातील प्रगतीसाठी क्रीडा साहित्य व गणवेश कोसुंब हायस्कूलला  निस्वार्थीपणे देऊन स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले होते. ए.पी.आय. राकेश जाधव यांनी प्राप्त केलेल्या यशाचे आणि अभिमानास्पद कार्यकर्तृत्वाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3392512
Share This Article