GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी : अस्तित्व विसरत चाललेल्या माणसाला मनशक्तीच्या माध्यमाची गरज – सीईओ वैदेही रानडे

Gramin Varta
53 Views

रत्नागिरी : मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात माणूस स्वतःचे अस्तित्वच विसरत चालला आहे. मनशांती हरवत चालला आहे. अशावेळी स्वतःच्या मनाला योग्य दिशा देण्यासाठी ‘मनशक्ती’सारख्या माध्यमाची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी केले.

येथील स्वा.सावरकर नाट्यगृहात लोणावळा येथील मनशक्ती प्रयोग केंद्र आणि स्थानिक केंद्र रत्नागिरी तर्फे आयोजित ‘ यश शांतीसाठी न्यू वे’ या दोन दिवसीय विनामूल्य उपक्रमाचे उद्घाटन आज झाले. त्यावेळी त्या अध्यक्षीय भाषणात वैदेही रानडे बोलत होत्या.

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रत्नागिरीच्या नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे, मनशक्ती प्रयोगा केंद्राचे प्रमुख विश्वस्त प्रमोदभाई शिंदे, जीवनदानी साधक मयूर चंदने, रत्नागिरी केंद्राचे ज्येष्ठ साधक राजन नाईक, राजश्री मालुष्टे उपस्थित होते. यावेळी आशा सेविका, नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी, विविध शाळांचे विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी वैदेही रानडे यांनी सांगितले की, नवीन पिढीला अपील होईल अशी टॅगलाइन असलेला ‘यश शांतीसाठी – न्यू वे’ हा मनशक्ती प्रयोग केंद्राचा उपक्रम खरोखरच विज्ञानाधिष्ठित आहे. जन्मपूर्व ते शेवटापर्यंत विविध स्तरावर माणसाच्या उपयोगी पडणारी वेगवेगळ्या विषयांवरची विवेचन सत्रे या दोन दिवसीय विनामूल्य उपक्रमांमध्ये आयोजित करण्यात आली आहेत. या विवेचनांच्या जोडीला मनाची शक्ती, एकाग्रता याचे मोजमाप करणारे, मेंदूला चालना देणारे एवढेच नव्हे तर स्वतःला काहीतरी वेगळं करायचंय याची कुठेतरी मनामध्ये भावना निर्माण करणारे विविध वैज्ञानिक प्रयोगदेखील मांडण्यात आलेले आहेत. सामान्यपणे आपण गर्भवती माता आणि तिच्या पोटातील बाळाच्या केवळ शारीरिक पोषणाचा विचार करतो. परंतु या बाळाच्या आणि मातेच्या मनाचादेखील विचार व्हायला पाहिजे, तो मनशक्तीने केलेला आहे. मनशक्तीचे विज्ञानाधिष्ठित कार्य तब्बल पन्नास वर्षे यशस्वीपणे चालू आहे, यामध्येच या संस्थेच्या सर्व उपक्रमांचे महत्त्व आणि यश अधोरेखित होते. आज लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तणावाला सामोरे जावे लागत आहे. त्यातच मोबाइलच्या जमान्यात सर्वजण मनशांती हरवत चालले आहेत. अशावेळी मनशक्तीच्या या उपक्रमांमधील आपला सहभाग आपल्या मनाला निश्चितच योग्य दिशा देण्याचे काम करेल, असा विश्वास श्रीमती रानडे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी सांगितले की, विज्ञानाने खूप प्रगती केली. विविध तंत्रज्ञान विकसित केले. तरीसुद्धा माणूस आतून अस्वस्थच आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात मन शांत नाही. अस्थिर आहे. या अस्थिर मनाला शांत करण्यासाठी लोणावळा येथील मनशक्ती केंद्र चांगले काम करत आहे.आज केवळ मोठ्या माणसांनाच नव्हे तर लहान विद्यार्थ्यांनासुद्धा प्रचंड ताण आहे. सर्वजण तणावाखाली आहेत. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मनाला शांत करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मनशक्तीचे उपक्रम समाजाला दिशा देणारे आहेत. मनशक्ती पाठीशी असेल तर आम्हीसुद्धा खूप काही करू शकतो, विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रास्ताविकात मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोदभाई शिंदे यांनी सांगितले की, रत्नागिरी ही विचारवंतांची भूमी आहे. या भूमीने भारतमातेसाठी लोकमान्य टिळकांपासून अनेक सुपुत्र दिलेले आहेत. त्यांच्या विचारांचा आदर्श आजही आपण बाळगत आहोत. या सर्वांनी आपले आयुष्य देशासाठी समर्पण करेन अशी प्रतिज्ञा बालपणीच घेतलेली होती. या थोर विचारवंतांच्या भूमीमध्ये मनशक्तीचा हा उपक्रम होत आहे. लहान मुलांपासून तरुण, प्रौढ सर्वांनाच रोजच्या धकाधकीच्या जीवनात मनाला शांती हवी असते. ती कशी मिळवायची याचे विज्ञान शुद्ध मार्गदर्शन मनशक्तीने विविध उपक्रमाच्या माध्यमातून केले आहे. विविध विवेचनांबरोबरच माइंड जिमसारखा भव्य प्रकल्पदेखील मनाशक्तीने रत्नागिरीत आणलेला आहे. विविध सुमारे २०० ग्रंथ, प्रयोगात्मक साहित्य याचे प्रदर्शनदेखील या उपक्रमात मांडलेले आहे. रत्नागिरीकरांना ज्ञान प्रेरित करण्याची इच्छा बाळगून हा उपक्रम घेण्यात आला आहे. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवतेच्या कल्याणाचा विशाल दृष्टिकोन बाळगून सुरू असलेल्या या उपक्रमाचा लाभ रत्नागिरीकरांनी घ्यावा असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.

Total Visitor Counter

3199498
Share This Article