रत्नागिरी: इस्लामिक कॅलेंडरनुसार रबी-उल-अव्वलच्या १२ व्या तारखेला साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त रत्नागिरी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवांनी शहरात भव्य रॅली काढली, ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
ही रॅली बाजारपेठ ते जयस्तंभ, मारुती मंदिर मार्गे पुन्हा बाजारपेठेत परत अशी काढण्यात आली. रॅलीमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटांतील मुस्लिम बांधवांचा सहभाग होता. शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांत मार्गाने ही रॅली पार पडली. यावेळी संपूर्ण रॅली मार्गावर शांतता आणि एकोपा कायम ठेवण्यात आला, ज्यामुळे या धार्मिक उत्सवाचा आनंद द्विगुणीत झाला.
ईद-ए-मिलाद-उन-नबी हा सण मुस्लिम समुदायात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याला मौलिद किंवा १२ वफत असेही म्हणतात. पैगंबर मोहम्मद साहेबांचा जन्म आणि त्यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मुस्लिम बांधव त्यांच्या शिकवणी आणि आदर्श जीवनाचे स्मरण करतात, तसेच त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतात.
या उत्सवाचे मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. प्रेम, एकता आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक मानला जाणारा हा दिवस जगभरातील मुस्लिमांना एकत्र आणतो. रत्नागिरीतील या भव्य रॅलीतूनही हाच संदेश दिसून आला. शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढलेल्या या रॅलीचे नागरिकांनी कौतुक केले. या निमित्ताने रत्नागिरी शहरातील धार्मिक सलोखा आणि एकतेची भावना अधिक मजबूत झाली.