GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग: पुण्याहून खेडला येणाऱ्या खासगी बसचा पोलादपूरनजीक थरारक अपघात; ट्रॅव्हल्स ५० फूट दरीत कोसळली, २२ प्रवासी जखमी

Gramin Varta
871 Views

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका थांबता थांबत नसून, आज सोमवारी पहाटे रायगड जिल्ह्यातील पोलादपूरनजीक एका खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. पुण्याहून खेडच्या दिशेने येणारी ही खासगी ट्रॅव्हलर बस महामार्गावरील पुलाच्या अलीकडे असलेल्या बॅरिकेटला धडक देऊन सुमारे ४५ ते ५० फूट खोल दरीत कोसळली. २४ नोव्हेंबरच्या पहाटे पाचच्या सुमारास भोगाव गावानजीक हा थरार घडला. या दुर्दैवी घटनेत २२ प्रवासी जखमी झाले असून, त्यातील १० प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. पहाटेच्या वेळी असलेल्या दाट धुक्यामुळे आणि महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

​सविस्तर माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या रुंदीकरणाचे आणि दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या ठिकाणी एक लेन वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी पहाटेच्या सुमारास या परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पसरले होते. पुण्याहून खेडकडे येत असताना भोगाव गावानजीक चालकाला रस्त्यावरील बॅरिकेट्सचा अंदाज न आल्याने बस थेट बॅरिकेट्स तोडून सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली. अपघात घडताच बसमधील प्रवाशांनी एकच आक्रोश केला. बस दरीत कोसळल्याचा मोठा आवाज होताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. अंधार आणि दरीचा भाग असूनही ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत जखमींना बाहेर काढले. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

​या भीषण अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले असून काहींना खेडमधील कळंबनी उपजिल्हा रुग्णालयात तर काहींना अधिक उपचारासाठी चिपळूण आणि डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्यांमध्ये शामल विजय अंजर्लेकर (वय ४०, रा. गिम्हवणे, दापोली), काजल मारुती शिगवण (२३, रा. दमामे, दापोली), दिलीप शिवराम मोहिते (५५, रा. तळसर, चिपळूण), अमरनाथ मिलिंद कांबळे (२७, रा. लातूर), दिपाली दत्ताराम नाचरे (२७, रा. भडवणे, दापोली), प्रतीक प्रकाश गुरव (२२, रा. शिरवली, खेड), प्रिया प्रकाश गुरव (२३, रा. शिरवली, खेड), आळंदी बालाजी नाचरे (७४, रा. दमामे, दापोली), सर्वेश दीपक गुहागरकर (२२, रा. आडे, दापोली) आणि मयुरी मारुती शिगवण (४५, रा. दमामे, दापोली) यांचा समावेश आहे. याशिवाय बसचा चालक, वाहक आणि इतर दहा प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चिपळूण आणि डेरवण येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

​खेड शहरात दररोज एसटी बससेवेप्रमाणेच दिवसातून तीन वेळा ‘खेड-पुणे’ ही खासगी प्रवासी वाहतूक टेम्पो ट्रॅव्हलरद्वारे केली जाते. आज अपघातग्रस्त झालेली गाडी देखील याच मार्गावर नियमित धावणारी होती, असे समजते. या अपघातामुळे नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. महामार्गावर सुरू असलेले संथ काम, अर्धवट बॅरिकेटिंग आणि त्यातच पहाटेचे धुके यामुळे प्रवाशांच्या जीवाला घोर लागला आहे. दरम्यान, अपघातस्थळी मोठी वाहतूक कोंडी झाल्याने महामार्ग पोलिसांनी विशेष पथके तैनात करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताचा पुढील तपास पोलादपूर पोलीस करत असून जखमींच्या प्रकृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitor Counter

3073097
Share This Article