कल्याणी रहाटे, संगिता चव्हाण यांच्या नावाची चर्चा
राजापूर | प्रतिनिधी
आगामी राजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी दोन प्रभावी महिला उमेदवार समोर आल्या आहेत. कल्याणी रहाटे आणि संगिता भिकाजी चव्हाण या दोघींच्या नावांवर स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दोघींचा राजकीय व सामाजिक प्रभाव पाहता पक्षालाही निर्णय घेणे कठीण जाणार असे दिसते.
संगिता भिकाजी चव्हाण या शिवसेनेच्या जुना निष्ठावान कार्यकर्त्या असून त्यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी मानला जातो. त्यांच्या वडिलांनी, भिकाजी गजानन चव्हाण यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. समाजकारणातून पुढे आलेल्या संगिता चव्हाण यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम केले आहे. “मी पहिल्यापासून शिवसेनेत असून, जातपात न पाहता लोकांची सेवा करणे हेच माझे ध्येय आहे,” असे त्या म्हणतात. त्या अधिक समाजसेविका म्हणून ओळखल्या जातात आणि जनतेत त्यांचा स्नेहसंबंध दृढ आहे.
तर दुसरीकडे कल्याणी रहाटे या देखील प्रबळ दावेदार म्हणून उदयास आल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक सामाजिक उपक्रम राबविल्याची नोंद आहे. राजापुरातील नागरिकांशी त्यांचा घट्ट संपर्क आहे. पक्षातील कामकाजात सातत्याने सहभाग घेत त्या उद्धव ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिल्या आहेत. लोकांशी संवाद साधण्याची त्यांची खास पद्धत आणि सौम्य वर्तणूक यामुळे त्यांचा जनाधार वाढला आहे.
संगिता चव्हाण आणि कल्याणी रहाटे — दोघीही कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय असून पक्षनिष्ठा, समाजसेवा आणि जनसंपर्क या तिन्ही बाबतीत परिपूर्ण आहेत. त्यामुळे येत्या नगराध्यक्ष निवडणुकीत उबाठा गटाकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दोघींचा गोडवा, कार्यतत्परता आणि जनतेशी असलेला स्नेह पाहता म्हणावेसे वाटते —
“या दोनही महिलांमध्ये नेतृत्वाची ताकद आहे, आणि राजापुरकरांचा विश्वास जिंकण्याची क्षमता देखील!”