GRAMIN SEARCH BANNER

राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची निवड

Gramin Varta
177 Views

कडवई / मिलिंद चव्हाण: रत्नागिरी येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय धनुर्विद्या निवड चाचणी स्पर्धेत कडवई येथील भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेच्या पाचही सहभागी विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघात निवड करण्यात आली असून या यशाने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशनच्या अधिपत्याखाली आणि सोलापूर जिल्हा धनुर्विद्या असोसिएशनच्या सहकार्याने १७ वी मिनी सबज्युनिअर व दुसरी किड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा २०२५-२६ लवकरच संपन्न होणार आहे. या आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी १ जानेवारी २०२६ रोजी जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा १०, १३ व १५ वयोगटातील मुले व मुली यांच्यासाठी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने कम्पाउंड, रिकर्व्ह आणि इंडियन या प्रकारांचा समावेश होता.

या जिल्हास्तरीय निवड चाचणीत जिल्ह्यातून अनेक खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये कडवई पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या पाच खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. विशेष कौतुकाची बाब म्हणजे या स्पर्धेत सहभागी झालेल्या संस्थेच्या पाचही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये साईराज सुर्वे, स्वराज चव्हाण, आर्या जोयशी, स्वरा इंजले आणि परिणीती कांबळे यांचा समावेश आहे. निवड झालेल्या या गुणवंत खेळाडूंना यावेळी मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यलगुडकर, सचिव वसंत उजगावकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण तसेच शाळेचे मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांना पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हे यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक संतोष साळुंके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून खेळाडूंनी यासाठी विशेष परिश्रम घेतले होते.

Total Visitor Counter

3369179
Share This Article