GRAMIN SEARCH BANNER

दापोलीत माजी प्राध्यापकाला डिजिटल अरेस्टची भिती दाखवून १ कोटी २३ लाख रुपयांना गंडवले

Gramin Varta
125 Views

दापोली: सायबर गुन्हेगारांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून दापोलीतील एका उच्चशिक्षित माजी प्राध्यापकाची १ कोटी २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने संपूर्ण तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक पदावरून नुकतेच निवृत्त झालेले डॉ. मकरंद जोशी यांना ४ नोव्हेंबर २०२५ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत आकाश शर्मा, शिवप्रकाश आणि दया नायक नावाच्या व्यक्तींनी फोनद्वारे संपर्क साधला. आपण बेंगळुरू पोलीस आणि नवी दिल्लीतील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून या संशयितांनी जोशी यांचा विश्वास संपादन केला. तुमच्या नावावर मुंबईतील माटुंगा येथील कॅनरा बँक शाखेत खाते असून, त्यातून ३ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा बनाव या टोळीने रचला. या प्रकरणातून सुटका करण्यासाठी ५० लाख रुपयांचा दंड भरावा लागेल, अन्यथा तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ केले जाईल, अशी धमकी देऊन जोशी यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकण्यात आला.

भयभीत झालेल्या डॉ. जोशी यांनी संशयितांच्या सूचनेनुसार ऍक्सिस बँक (तुळजापूर), आयडीएफसी बँक (मुंबई) आणि आयसीआयसीआय बँक (वाशी, नवी मुंबई) येथील विविध खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने एकूण १ कोटी २३ लाख रुपये जमा केले. मात्र, ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तातडीने दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून तिन्ही संशयितांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक महेश तोरस्कर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. कोकण पट्ट्यात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याचे यावरून स्पष्ट होत असून, नागरिकांनी अनोळखी फोन कॉल्सना बळी पडू नये आणि सतर्क राहावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3379742
Share This Article