बँक शाखाधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा
रत्नागिरी: कोकणासह राज्यात नावाजलेल्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, रत्नागिरीच्या कर्ला शाखेत तब्बल ५० लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची अफरातफर झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बँकेच्या तीन कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा अपहार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका शिपायाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
ही घटना फेब्रुवारी २० २५ ते ऑगस्ट २० २५ या कालावधीत घडल्याचे समोर आले आहे. बँकेच्या कर्ला शाखेतील तिजोरीमध्ये तारण म्हणून ठेवलेले ५०४.३४ ग्रॅम वजनाचे (सुमारे ५० तोळे) सोन्याचे दागिने गायब झाल्याचे उघडकीस आले. या सोन्याची बाजारपेठेतील किंमत अंदाजे ५० लाख रुपये आहे.
बँकेचे फिर्यादी सुधीर गिम्हवणेकर यांनी बुधवारी, २१ ऑगस्ट रोजी शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यातील आरोपींमध्ये बँकेचे शाखाधिकारी किरण विठ्ठल बारये, शिपाई अमोल आत्माराम मोहिते आणि कॅशिअर ओंकार अरविंद कोळवणकर यांचा समावेश आहे. या तिघांनी आपापसांत संगनमत करून, त्यांच्यावर बँकेने ठेवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. त्यांनी तिजोरीतील तारण ठेवलेल्या सोन्याच्या पिशव्यांमधून हे दागिने आपल्या फायद्यासाठी काढून घेतले आणि त्याचा अपहार केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यामध्ये नाव असलेल्या शिपाई अमोल आत्माराम मोहिते याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणाच्या सखोल तपासाअंती आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. बँकेसारख्या सुरक्षित ठिकाणी अशा प्रकारचा अपहार झाल्याने रत्नागिरी जिल्ह्याच्या आर्थिक वर्तुळात चिंता व्यक्त केली जात आहे.