GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी नगरपालिकेची धडक कारवाई; चर्मालय परिसरातील ९० अनधिकृत बांधकामे जेसीबीने हटवली

Gramin Varta
112 Views

रत्नागिरी :  शहराच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेली चर्मालय ते कोकणनगर दरम्यानची बहुचर्चित अतिक्रमण हटाव मोहीम बुधवार सकाळपासून अखेर सुरू झाली आहे. नगरपालिकेच्या पथकाने बुधवारी सकाळीच जेसीबीसह घटनास्थळी धडक देत या भागातील अनधिकृत बांधकामे आणि दुकाने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी 90 पेक्षा अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
चर्मालय ते कोकणनगर या वर्दळीच्या आणि मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दुकाने आणि पक्की बांधकामे उभी राहिली होती. या वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत होत्या. तसेच, शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ११ केव्हीची भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे कामही याच अतिक्रमणांमुळे अनेक दिवसांपासून खोळंबले आहे.

ही धडक मोहीम काही दिवसांपूर्वीच राबवण्यात येणार होती. मात्र, मागील वेळी सणासुदीचे दिवस पाहता प्रशासनाने ही कारवाई तात्पुरती पुढे ढकलली होती. त्यावेळी संबंधित अनधिकृत दुकानदारांनी आपली बांधकामे व दुकाने स्वतःहून हटवण्यासाठी प्रशासनाकडे मुदत मागून घेतली होती. प्रशासनाने त्यांना मुदत देऊनही, तब्बल महिना उलटला तरी अतिक्रमणे ‘जैसे थे’च होती. व्यावसायिकांनी स्वतःहून दुकाने न हटवल्याने अखेर प्रशासनाला कडक पावले उचलावी लागली.

बुधवारी सकाळीच नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी जेसीबी मशीन आणि आवश्यक त्या फौजफाट्यासह चर्मालय-कोकणनगर परिसरात दाखल झाले. कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट कारवाईला सुरुवात झाल्याने अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांची मोठी धांदल उडाली. या धडक कारवाईमुळे आता ११ केव्ही भूमिगत विद्युत वाहिनीचे प्रलंबित काम गतीने पूर्ण होण्यास मदत होणार असून, रस्ता रुंदीकरणाचा मार्गही कायमचा मोकळा होणार आहे.

Total Visitor Counter

3362975
Share This Article