खेड : तालुक्यातील तिसंगी खेडकडे जाणाऱ्या रोडवर जनावरांच्या शेणावरून झालेल्या वादानंतर मारहाणीची घटना घडली, यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. ही घटना १० जुलै रोजी सायंकाळी ०७.०० वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी सुषमा संतोष मोहिते (वय ५१, रा. तिसंगी जांभुळवाडी, ता. खेड) यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, आरोपी तुकाराम रामचंद्र खामकर (रा. तिसंगी जांभुळवाडी, ता. खेड) हा त्याची गुरे चारून घरी परत घेऊन जात होता. यावेळी रस्त्यावर पडलेल्या शेणामुळे चारचाकी वाहन गेल्याने ते शेण फिर्यादीच्या पतीच्या सलूनच्या दुकानावर उडले. यावरून सुषमा मोहिते यांचे पती संतोष सीताराम मोहिते यांनी तुकाराम खामकरला शेण बाजूला करण्यास सांगितले. यावरून तुकाराम खामकरला राग आला. त्याने संतोष मोहिते यांना हातातील काठीने मारहाण करून शिवीगाळ केली आणि “तुला काय करायचे आहे ते कर” असे धमकावले.
पतीला मारहाण होताना पाहून सुषमा मोहिते भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेल्या असता, आरोपी तुकाराम खामकरने त्यांनाही हातावर काठीने मारहाण केली. या हल्ल्यात सुषमा मोहिते यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तुकाराम खामकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
खेडमध्ये शेणाच्या वादातून महिलेला मारहाण
