GRAMIN SEARCH BANNER

देवरूखच्या विश्वविक्रमी रांगोळीकार विलास रहाटे यांनी सुपार्‍यांवर अष्टविनायक साकारत दाखवली गणेशभक्ती

Gramin Varta
10 Views

देवरूख कोकणात सध्या सर्वत्र गणेशोत्सव धडाक्यात साजरा होत आहे. भाविक आपआपल्या पद्धतीने गणरायांचे समरण करत त्याची भक्ती करत आहेत. यामध्ये कलाकारही मागे नाहीत. विविध कलाकार आपआपल्या कलेतून गणेशाची भक्ती करत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील युवा चित्रकार आणि रांगोळीकार विलास रहाटे हे अशांपैकीच एक. त्यांनी चक्क सुपार्‍यांवर गणेशाची रुपे साकारली आहेत. रहाटे यांनी आठ सुपार्‍यांवर अष्टविनायकांची चित्रे रेखाटली आहेत. सुपार्‍यांवर अ‍ॅक्रलिक रंगांच्या माध्यमात त्यांनी या चित्रकृती साकारल्या आहेत.

कलेमध्ये नेहमी आगळे वेगळे प्रयोग करणारे देवरुखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार श्री. विलास विजय रहाटे यांनी गणेशोत्सवात गणपती बाप्पाची आराधना व सेवा अभिनव पद्धतीने केली आहे. गणपती बाप्पाचे निस्सिम भक्त आणि विविध कलांचे चाहते असणाऱ्या श्री. विलास रहाटे यांनी गणरायाची स्थान असणाऱ्या छोट्याशा सुपारीवर अष्टविनायकाची मालिका तयार केली आहे. सुपारीवरील या आठ कलाकृतींमध्ये मोरेश्वर(मोरगाव), सिद्धेश्वर(सिद्धटेक), बल्लाळेश्वर (पाली), वरदविनायक (महाड), चिंतामणी(थेऊर), गिरिजात्मक (लेण्याद्री), विघ्नेश्वर(ओझर), महागणपती (रांजणगाव) या अष्टविनायकांच्या छबिंचा चित्ररूपी समावेश आहे.

श्री. विलास रहाटे यांनी यापूर्वी छोट्याशा तांदूळ अक्षदांवर गणरायाचे चित्र साकारले होते. विविध रांगोळी प्रकारातून, चित्रातून, माती कामातून, विविध साहित्यातील डिझाईनमधून त्यांच्याकडून नियमितपणे गणपती बाप्पांची सेवा होत असते. श्री. विलास रहाटे यांच्या नावावर जगातील छोट्या रांगोळीची नोंद जागतिक दर्जाच्या ७ रेकॉर्डमध्ये यापूर्वी झाली आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ३ सेमी बाय ३ सेमी आकाराची रांगोळी २५ मिनिटात काढताना त्यांनी १० ग्रॅम रांगोळीचा वापर केला होता. विलास रहाटे यांच्या यावेळच्या नवीन उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या संकल्पनेविषयी सांगताना विलास रहाटे म्हणाले की आपल्या संस्कृतीत सुपारीला मोठे धार्मिक स्थान आहे. प्रत्येक पूजा आणि होम हवनात सुपारी महत्वाची असते. त्यामुळे सुपारीवर गणेशचित्र साकारण्याची कल्पना सुचल्याचे ते म्हणाले.

Total Visitor Counter

2647287
Share This Article