मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे कॅलेंडर जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये प्रवेशपूर्व ऑनलाइन नाव नोंदणी, अंतर्गत व थेयरी ( लेखी) परीक्षा ते निकालाचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाने निर्गमित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे १३ जून २०२५ पासून सुरू झालेल्या शैक्षणिक वर्षातील मानव्यविज्ञान, वाणिज्य व विज्ञान शाखेतील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या सत्र १ आणि द्वितीय वर्ष सत्र ३ तसेच एटीकेटीच्या परीक्षा या ०९ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत परीक्षांचे नियमाप्रमाणे नियोजन करायचे आहे.
विशेष म्हणजे १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत महाविद्यालयांनी समर्थ पोर्टलवर विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज व शुल्क भरावयाचे आहेत. तसेच २८ नोव्हेंबर २०२५ पर्यंत या परीक्षांच्या मूल्यांकनाचा तपशील समर्थ पोर्टलवर निश्चित करण्यात आलेल्या कार्यपद्धतीनुसार उपलब्ध करून द्यावयाचा आहे.
पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या सत्र १ आणि द्वितीय वर्ष सत्र ३ तसेच एटीकेटीच्या परीक्षासाठी महाविद्यालयांनी प्रश्नपत्रिका तयार करणे ते मूल्यांकन करून अंतरिम निकाल किवा गुण जाहीर करण्याची प्रक्रिया विद्यापीठाच्या ३० जून २०२५ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकाप्रमाणे करण्याचे आवाहन द्यापीठाकडून करण्यात आले आहे.
महाविद्यालयांनी सादर केलेल्या तपशिलाच्या अनुषंगाने विद्यापीठामार्फत अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार असून विद्यापीठामार्फत विद्यार्थ्यांच्या डिजिटल गुणपत्रिका तयार केल्या जातील व त्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना त्यांच्या समर्थ पोर्टलच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिल्या जातील तसेच डिजिलॉकरवरही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
पहा वेळापत्रक
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदवी अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक नियोजनाच्या कॅलेंडरनुसार २७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ हा मिड टर्म ब्रेक, २१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ दिवाळी सुट्टी आणि हिवाळी सुट्टी ५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ असे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई विद्यापीठाचे पदवी अभ्यासक्रमाचे कॅलेंडर जाहीर, कसे असेल वेळापत्रक?

Leave a Comment