GRAMIN SEARCH BANNER

राजापूर: कुळ कायद्यामुळे शेतकरी फार्मर आयडीपासून वंचित; १५ ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा

राजापूर: राजापूर तालुक्यातील श्री धूतपापेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या कार्यक्षेत्रातील सुमारे ८० टक्के शेतकरी प्रत्यक्ष शेती करत असूनही, सातबारा उताऱ्यावर ‘कुळ’ म्हणून नोंद असल्यामुळे त्यांना फार्मर आयडी (Farmer ID) मिळत नाहीये. परिणामी, शासनाच्या अनेक योजनांपासून या शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे. याच प्रमुख मागणीसाठी येत्या १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा इशारा सोसायटीचे चेअरमन प्रकाश आमकर यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

श्री धूतपापेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी पंचक्रोशीतील शेतकरी सभासदांना भातपीक, आंबापीक, काजूपीक यासाठी कर्ज वितरण करते. मात्र, आता शासनाने सुरू केलेली शेतकरी कार्डची संकल्पना कुळांच्या जीवावर बेतली असल्याचा आरोप आमकर यांनी केला आहे. धोपेश्वर पंचक्रोशीतील ८० टक्के शेतकरी कुळधारक असल्याने आणि तांत्रिक अडचणींमुळे त्यांना शेतकरी कार्ड काढता येत नाहीये. “देश ‘आझादी का अमृतमहोत्सव’ साजरा करत असताना, इथले शेतकरी अजूनही भोगवटदारांच्या गुलामगिरीत जगत आहेत. ‘कसेल त्याची जमीन’ हे कायदे फक्त कागदावरच आहेत का? त्यांची अंमलबजावणी कधी होणार?” असा संतप्त सवाल या निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या धोरणांवरही या निवेदनातून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. यापूर्वी जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून कर्जविषयक गरजा पूर्ण करत होती. मात्र, मागील दोन वर्षांपासून बँकेच्या धोरणात मोठा बदल झाला असून, हिस्सापुरता बोजा नोंद असतानाही इतर सह-हिस्सेदारांच्या संमतीशिवाय बँक कर्ज देत नाहीये. शिवाय, मागील दोन वर्षांपासून केंद्र व राज्य शासनाचे अनुदानही जमा झालेले नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगायचे कसे, असा गंभीर प्रश्नही निवेदनातून विचारण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या या ज्वलंत प्रश्नांवर शासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Total Visitor Counter

2455614
Share This Article