GRAMIN SEARCH BANNER

ब्रेकिंग : रत्नागिरी मांडवीत भररस्त्यात तरुणावर कोयत्याने सपासप वार

saurabhsalvi26@gmail.com
13.8k Views

रत्नागिरी: शहरातील शांततेला तडा देणारी आणि थरकाप उडवणारी एक अत्यंत गंभीर घटना आज सायंकाळी मांडवी येथील भुतेनाका परिसरात घडली आहे. भररस्त्यात दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणावर मद्यधुंद हल्लेखोराने कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गजबजलेल्या ठिकाणी अचानक घडलेल्या या रक्तरंजित प्रकारामुळे संपूर्ण रत्नागिरी शहरात भीती आणि दहशतीचे वातावरण पसरले आहे.

घडलेल्या घटनेनुसार, आज सायंकाळी भुतेनाका रस्त्यावर एक मद्यप्राशन केलेला तरुण हातात कोयता घेऊन फिरत होता आणि येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना धमकावत होता. याच वेळी बस स्थानकाकडून मांडवीच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जाणाऱ्या एका तरुणाला त्याने लक्ष्य केले. या हल्लेखोराने कोणताही विचार न करता त्या तरुणावर कोयत्याने एकामागोमाग एक वार केले. यामुळे तो तरुण जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. अंकुश मांडवकर (भुतेनाका, रत्नागिरी) असे हल्लेखोराचे नाव आहे. तर जखमी अरमान इनामदार (29, मिरकरवाडा, रत्नागिरी) असे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी शहर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अचानक घडलेल्या या हल्ल्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी तात्काळ परिसर बंदोबस्तात घेतला. जखमी तरुणाला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मांडवीसारख्या गजबजलेल्या ठिकाणी, सायंकाळी भररस्त्यात हा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे सावट पसरले आहे. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून झाला, हल्लेखोर कोण होता आणि यामागे नेमके कोणते कारण आहे, याबाबत आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. खुनामागचे नेमके कारण आणि आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, संपूर्ण रत्नागिरी शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

Total Visitor Counter

3483788
Share This Article