GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरीत १४ जानेवारीपासून ‘लायन्स महोत्सव – फॅमिली फनफेअर २०२६’चे आयोजन

Gramin Varta
109 Views

रत्नागिरी: लायन्स क्लब रत्नागिरीतर्फे सामाजिक आणि सेवाभावी कार्याला हातभार लावण्यासाठी ‘लायन्स महोत्सव – फॅमिली फनफेअर २०२६’ या भव्य औद्योगिक, कन्झ्युमर आणि फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.

हा महोत्सव १४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत माळनाका येथील आर. बी. शिर्के हायस्कूलच्या मैदानात दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत रंगणार आहे. या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन बुधवार, १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७:०० वाजता उद्योगमंत्री ना. उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. एमआयडीसी विभाग महाराष्ट्र राज्य हे या महोत्सवाचे प्रमुख प्रायोजक आहेत.

या महोत्सवात शेती, औद्योगिक उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल आणि गृहोपयोगी वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री दालने असणार आहेत. खवय्यांसाठी व्हेज आणि नॉन-व्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल असा विशेष ‘फूड फेस्टिव्हल’ हे या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरेल. मनोरंजनासाठी मुलांसाठी फनी गेम्स, अम्युझमेंट पार्क, दररोज लकी ड्रॉ, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य आणि क्विझ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण कुटुंबासह आनंद लुटता येईल अशा स्वरूपाचे हे नियोजन आहे.

लायन्स क्लब रत्नागिरी गेल्या ५२ वर्षांपासून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, या महोत्सवातून मिळणारा निधी लायन्स आय हॉस्पिटलमधील मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि इतर सामाजिक प्रकल्पांसाठी वापरला जाणार आहे. अंधत्व निवारणाच्या या कार्याला बळ देण्यासाठी आणि महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष संजय पटवर्धन यांनी केले आहे.

Total Visitor Counter

3225173
Share This Article