GRAMIN SEARCH BANNER

चिपळूण : मार्कंडी येथे लोकवस्तीत शिरलेल्या मगरीला वनविभागाकडून जीवदान

Gramin Varta
103 Views

चिपळूण: शहरातील मार्कंडी येथील तिरुमला परिसरात लोकवस्तीमध्ये अचानक एक मगर आढळून आल्याने नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. मात्र, वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तत्परता दाखवत या मगरीला सुरक्षितपणे जेरबंद केले आणि पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सोडले. या यशस्वी मोहिमेमुळे परिसरातील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

मार्कंडी येथील तिरुमला परिसरात मगर असल्याचे स्थानिक रहिवासी संदेश शेलार यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने याची माहिती वनविभागाला दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाची रेस्क्यू टीम आधुनिक पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाली. टीमने अत्यंत कौशल्याने मगरीला जेरबंद केले. मगरीची प्रकृती उत्तम असल्याची खात्री पटल्यानंतर, वरिष्ठांच्या आदेशानुसार तिला मानवी वस्तीपासून दूर सुरक्षित ठिकाणी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
हे बचावकार्य विभागीय वन अधिकारी सौ. गिरीजा देसाई पाटील, सहाय्यक वनसंरक्षक श्रीम. प्रियंका लगड आणि वन परिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले, शिवराज शिर्के, अजय बडदे आणि सुरेंद्र भोंडवे यांचा समावेश होता. वनविभागाच्या या धाडसी कामगिरीचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहे.

Total Visitor Counter

3375700
Share This Article