GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी: १२ नॉटीकल मैलबाहेर मासेमारीला केंद्राची परवानगी

Gramin Varta
99 Views

रत्नागिरी: पावसाळ्यात वादळीवाऱ्यांमुळे अनेकवेळा हवामान विभागाच्या धोक्याच्या इशाऱ्यामुळे मच्छीमार नौका समुद्रात मासेमारीसाठी जाऊ शकल्या नाहीत.

आता मासेमारीला जाणाऱ्या नौकांना मासळीच मिळत नाही. अशा अडचणीच्या काळात सागरी विशेष आर्थिक क्षेत्रात म्हणजेच १२ नॉटीकल मैलबाहेर मासेमारीला केंद्र शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे यांत्रिकी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात ४ हजार १०२ मासेमारी नौका आहेत. त्यातील ३ हजार ५१९ यांत्रिकी नौका आहेत. या नौकांना केंद्र सरकारच्या अखत्यारितील खोल समुद्रातील मासेमारीला मुभा मिळाली आहे. केंद्राच्या नवीन नियमानुसार, यांत्रिकी नौकांना खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी केंद्र शासनाची परवानगी मिळू शकणार आहे. त्यामुळे जानेवारी ते मे महिन्यात या परवानगीवरून मत्स्य व्यवसाय विभाग आणि मच्छीमारांमध्ये होणारा वाद संपणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले. राज्यशासनाच्या सुधारित अधिनियमानुसार, जानेवारीपासून मे महिन्यापर्यंत केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या समुद्रात मासेमारी करून राज्यशासनाच्या समुद्रातून जेटीवर परतणाऱ्या नौकांवर कारवाई होत होती. आता केंद्राच्या नवीन नियमानुसार, ही कारवाई टळणार असल्याने मच्छीमार नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या नवीन नियमांमध्ये बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या नौकांवर दंडात्मक कारवाईची रक्कमही कमी आहे. केंद्राच्या समुद्रात जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा असल्याने या परवानग्यासुद्धा वेळेत मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारनेते विकास धाडस, नासीर वाघू, नुरूद्दीन पटेल यांनी केंद्र शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Total Visitor Counter

3206547
Share This Article