संगमेश्वर : तालुक्यातील देवळे येथे एका ३८ वर्षीय कामगाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहन रघुविर धाकड (मूळ रा. मध्य प्रदेश) असे या मृत व्यक्तीचे नाव असून, ते देवळे येथील ‘रवि इन्फ्रा’ कंपनीच्या प्लांटवर कामाला होते. १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास मोहन धाकड हे कामावर असताना त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. प्रकृती खालावल्याचे लक्षात येताच त्यांना तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पाली येथे दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रकरणाची नोंद केली आहे. मृत मोहन धाकड हे मध्य प्रदेशातील मुरेना जिल्ह्यातील धाँदा गावचे रहिवासी होते आणि रोजगारासाठी सध्या देवळे परिसरात वास्तव्यास होते. या आकस्मिक निधनाने कंपनीतील इतर कामगारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. देवरुख पोलीस ठाण्यात याप्रकरणी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्र. ०९/२०२६) करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.





