GRAMIN SEARCH BANNER

आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांमुळे लांजा-राजापूरला नव्या आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती मंजूर

Gramin Search
21 Views

ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक बळकट होणार

लांजा : लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या अथक पाठपुराव्यामुळे लांजा आणि राजापूर तालुक्यांतील आरोग्य सेवेला मोठा बूस्टर मिळाला आहे. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून तालुक्यांमध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांच्या नवीन आणि सुसज्ज इमारतींना मंजुरी मिळाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आता चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून लांजा तालुक्यातील पूनस उपकेंद्र आणि राजापूर तालुक्यातील कोंडये, अंगले, दोनिवडे येथील उपकेंद्रांच्या इमारतींची अवस्था अत्यंत जीर्ण झाली होती. यामुळे रुग्णांना तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही गंभीर बाब आमदार किरण सामंत यांनी गांभीर्याने घेतली. त्यांनी सातत्याने शासनाकडे यासंदर्भात पाठपुरावा केला, आणि अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या नवीन इमारतींचे बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

या नव्याने मंजूर झालेल्या इमारतींमध्ये रुग्णांसाठी उत्तम प्रतीच्या तपासणी सुविधा, औषधांची सहज उपलब्धता आणि इतर आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध असतील. यामुळे दुर्गम भागातील लोकांना उपचारासाठी दूरवर जाण्याची गरज भासणार नाही; त्यांना आता आपल्या जवळच दर्जेदार आरोग्य सेवा मिळू शकणार आहे.
आमदार किरण सामंत यांनी यापूर्वीही “ग्रामीण भागातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा पुरविणे हे माझे कर्तव्य आहे,” असे सांगितले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्याची प्रचिती दिसून येत आहे. या नवीन इमारतींमुळे नागरिकांचे आरोग्यमान सुधारण्यास आणि आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे व सहजपणे प्रत्येक घराघरात पोहोचण्यास निश्चितच मदत होईल.

Total Visitor Counter

3388318
Share This Article