नाटेतील महिला बँकेच्या चकरा मारून रडकुंडीला
नाटे/राजन लाड: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) ४ ऑक्टोबर २०२५ पासून लागू केलेली ‘सतत चेक क्लिअरिंग प्रणाली’ (Continuous Cheque Clearing System) सुरळीत होण्याऐवजी गोंधळात अडकल्याने सामान्य ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. चेक क्लिअर होऊन काही तासांत रक्कम खात्यात जमा होण्याची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात अनेक बँकांमध्ये तांत्रिक अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या प्रशिक्षणामुळे ग्राहकांना त्यांच्या पैशांसाठी दिवसन्दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. चेक जारी करणाऱ्या खात्यातून पैसे वजा होऊनही, ते जमा झालेल्या खात्यात न पोहोचल्याने अनेक आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत.
अनेक बँकांमध्ये सिस्टीम अपडेट न झाल्याने आणि कर्मचाऱ्यांमध्ये नवीन प्रणालीची पुरेशी माहिती नसल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. नवीन प्रणालीत चेक काही तासांत क्लिअर होणे अपेक्षित असताना, अनेक ठिकाणी तीन ते पाच दिवसांचा, तर काही प्रकरणांमध्ये दहा ते पंधरा दिवसांचा विलंब होत असल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत. ‘चेक डेबिट झाला, पण पैसे खात्यात नाहीत,’ या अवस्थेत ग्राहक अडकले आहेत.
राजापूर तालुक्यातील नाटे परिसरातील एका घटनेने या समस्येचे गांभीर्य स्पष्ट केले आहे. कर्जाच्या हप्त्यासाठी मिळालेला चेक एका महिलेनं बँकेत जमा केला, मात्र जवळपास १२ दिवस उलटूनही तिच्या खात्यात रक्कम जमा झाली नव्हती. विशेष म्हणजे, समोरच्या बँकेच्या खात्यातून रक्कम डेबिट झाली होती. पैसे खात्यात आले नसतानाही कर्जावर व्याज भरावे लागणार असल्याने, तसेच मुलांच्या शिक्षणासारखी महत्त्वाची कामे थांबल्याने ही महिला बँकेच्या पायऱ्या झिजवून अक्षरशः रडकुंडीला आली होती. नवीन चेक क्लिअरिंग व्यवस्थेतील त्रुटींचे हे एक ढळढळीत उदाहरण ठरले आहे.
या गंभीर अडचणींमुळे अनेक बँक शाखा व्यवस्थापकांना ग्राहकांच्या तक्रारीनंतर थेट क्लिअरिंग विभागाशी मेलद्वारे संपर्क साधावा लागत आहे. रक्कम नेमकी कुठे अडकली आहे, हे सिस्टीममध्ये स्पष्टपणे दिसत नसल्याने व्यवस्थापकांनाही ग्राहकांना ठोस उत्तर देणे शक्य होत नाहीये, तर क्लिअरिंग विभागाकडून प्रतिसाद येण्यास वेळ लागतो. अनेक बँकांतील अधिकारीही या नव्या प्रणालीच्या तांत्रिक तपशीलांबद्दल अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे ग्राहकांचा असंतोष वाढत आहे. अनेक ठिकाणी ग्राहकांनी तणाव व्यक्त करत बँकेत उद्रेक केल्याच्या घटनाही नोंदल्या गेल्या आहेत.
आरबीआयने चांगल्या उद्देशाने सुरू केलेली ही प्रणाली प्रत्यक्षात ग्राहकांसाठी मनस्तापाचे कारण ठरत आहे. त्यामुळे प्रणाली स्थिर होईपर्यंत अंतरिम मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याची मागणी ग्राहकांकडून जोर धरू लागली आहे. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत ग्राहकांनी आपल्या व्यवहारांचा संपूर्ण तपशील लेखी स्वरूपात जपून ठेवावा आणि चेक क्रमांक, तारीख, रक्कम तसेच डेबिट पुष्टीसह बँकेकडे लेखी तक्रार दाखल करावी.
राजन लाड (जैतापूर वार्ताहर)