GRAMIN SEARCH BANNER

भाईशा घोसाळकर हायस्कूलमध्ये ‘जागर माय मराठीचा’; ग्रंथदिंडीने साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ

Gramin Varta
25 Views

कडवई/ मिलिंद चव्हाण: कडवई पंचक्रोशी शिक्षण मंडळ संचलित भाईशा घोसाळकर हायस्कूल आणि कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, कडवई येथे २७ आणि २८ जानेवारी २०२६ रोजी दोन दिवसीय ‘मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले आहे. “जागर माय मराठीचा” या घोषवाक्याखाली आयोजित या मराठी भाषेच्या महोत्सवाचा प्रारंभ आज अत्यंत उत्साही वातावरणात ग्रंथदिंडीने करण्यात आला. गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीने परिसरातील वातावरण पूर्णपणे साहित्यमय झाले होते. या संमेलनाचे औपचारिक उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण यांच्या हस्ते पार पडले.

दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी साहित्याचा वारसा जोपासण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीनंतर अभिवाचन, कविता गायन, निबंध, सुंदर हस्ताक्षर, वक्तृत्व आणि स्वरचित कविता गायन अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उद्या २८ जानेवारी रोजी हस्तलिखित भिंत, साहित्यिक रांगोळी प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन आणि संत व साहित्यिक चित्र प्रदर्शन अशा भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून, बक्षीस वितरण व निरोप समारंभाने या संमेलनाची सांगता होईल.

या उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक शेषेराव अवघडे, पर्यवेक्षक संतोष साळुंखे, निलेश कुंभार, सूरज कदम, प्रदीप कानाल, मिलिंद कडवईकर, शशिकांत किंजलकर, सिद्धी सुर्वे, सिमेन काझी, समीर भालेकर, सौजन्या महाडिक, शुभम शिंदे, प्रिया चौघुले, सरिता साळवी, सोमनाथ कोष्टी, नयना राजेशिर्के, तानाजी दोरखडे, आप्पासाहेब शेडगे आणि अरविंद सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. या संमेलनासाठी चिपळूण येथील नामवंत साहित्यिक प्रा. सुहास बारटक्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, गटशिक्षणाधिकारी विजय परीट आणि शिक्षणविस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे. परिसरातील तमाम साहित्यप्रेमी आणि विद्यार्थ्यांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मराठी विभाग प्रमुख निलेश कुंभार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitor Counter

3367003
Share This Article