खेड: गुजरात येथील हाजिरा पोर्ट येथून श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स युनिट नं. ०५, खेडकडे येणाऱ्या एका टँकरमधील सुमारे १२ हजार ३२० रुपये किमतीचे ११० किलोग्रॅम ‘अॅनिलिन ऑईल’ हे महत्त्वाचे रॉ मटेरिअल (कच्चा माल) चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे टँकरचे वजन पूर्ववत दिसण्यासाठी चोरट्या चालकाने ऑईलच्या बदल्यात ११० किलोग्रॅम वजनाचे दगड टँकरच्या केबिनमध्ये ठेवले होते.
या प्रकरणी श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीचे शरद तुकाराम भोसले (वय ५०, रा. पुष्कर केमिकल अँड फर्टिलायझर्सचा बंगला, खेड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. कंपनीने एमएच ४३ बीएक्स ०८२७ या टँकरचा चालक दामोदर प्रसाद तिवारी (वय ४९, रा. माहुल रोड, मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०३(२) आणि ३१६(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरी १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १.०२ वाजल्यापासून ते १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान गुजरातच्या हाजिरा पोर्ट ते खेडमधील श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स युनिट नं. ०५ या प्रवासादरम्यान घडली.
आरोपी टँकर चालक दामोदर प्रसाद तिवारी याने नमूद टँकर कंपनीने लावलेले सील तोडले. त्यानंतर त्याने टँकरमधील ११० किलोग्रॅम ‘अॅनिलिन ऑईल’ हे रॉ मटेरिअल कंपनीच्या सहमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरून विकले. चोरीचा माल १२,३२० रुपये किमतीचा होता (प्रति किलो ११२ रुपये प्रमाणे).
माल चोरल्यानंतर टँकरच्या वजनात कोणताही फरक दिसू नये, यासाठी आरोपीने शक्कल लढवली. त्याने टँकरचे वजन पूर्ववत करण्यासाठी ११० किलोग्रॅम वजनाचे लहान-मोठे, ओबडधोबड असे काळ्या रंगाचे (काळोत्री) आठ दगड ड्रायव्हरच्या केबिनमध्ये, ड्रायव्हर सीटच्या मागील बाजूस असलेल्या लाकडी खोक्यात ठेवून दिले.
चोरीचा हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या वतीने फिर्याद देण्यात आली आणि २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१९ वाजता खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपी चालक दामोदर प्रसाद तिवारी याचा कसून शोध घेत असून पुढील तपास सुरू आहे.







