गुहागर: गुहागर तालुक्यातील मोडकाघर-तवसाळ रस्त्यावर शनिवारी सायंकाळी एक भीषण अपघात घडला. पेठे कंपनीसमोर अचानक आकेशियाचे एक भलेमोठे झाड रस्त्यावर कोसळले. दुर्दैवाने, त्याचवेळी तिथून जात असलेले बुलेटस्वार सुशांत सुनील आरेकर (रा. पालशेत) या झाडाखाली सापडून गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत आरेकर आपल्या बुलेटवरून जात असताना अचानक हे झाड बुलेटच्या दर्शनी भागावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने शृंगारतळी येथील डॉ. पवार यांच्या क्लिनिकमध्ये नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, पुढील उपचारांसाठी त्यांना चिपळूणला हलवण्यात आले.
या अपघातामुळे मोडकाघर-तवसाळ मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्वरित धाव घेऊन कोसळलेले झाड बाजूला केले आणि वाहतूक पूर्ववत सुरू केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, सार्वजनिक रस्त्यालगत असलेल्या जुन्या आणि धोकादायक झाडांची तातडीने निगा राखण्याची तसेच त्यांची तपासणी करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने अशा धोकादायक झाडांकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.