GRAMIN SEARCH BANNER

रत्नागिरी मिरजोळे येथील फिश मिल कंपनीतील कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
331 Views

रत्नागिरी : शहरानजीकाच्या मिरजोळे एमआयडीसी परिसरातील ‘फ्रिलान्स फिश मिल ॲन्ड ऑईल’ कंपनीत काम करणाऱ्या एका परप्रांतीय कामगाराचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयराम गणाराम राजबोंगशी (वय ४८, रा. घोंगापार, तामलपूर, बक्सा, राज्य आसाम) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना २६ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी कंपनीचे सुपरवायझर निखील विश्वास लाड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयराम राजबोंगशी हे मिरजोळे येथील फ्रिलान्स फिश मिल ॲन्ड ऑईल प्रा.लि. या कंपनीत कामाला होते आणि तिथेच वास्तव्यास होते. २६ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास कंपनीतील कामगार दिपज्योती करूणा दास याने जयराम यांना उठवण्यासाठी आवाज दिला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि त्यांची कोणतीही हालचाल होत नव्हती.

ही बाब लक्षात येताच सुपरवायझर निखील लाड यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता जयराम निपचित पडल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ॲम्बुलन्सने जयराम यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास मृत घोषित केले. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १०१/२०२५ नुसार नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitor Counter

3374416
Share This Article